काँग्रेस खासदाराची चौकशीची मागणी
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्यानेच स्थान देण्यात आलेले मंत्री निसिथ प्रामाणिक हे बांगलादेशचे नागरिक असल्याचा आरोप होत असून त्याबाबत चौकशी करावी, अशी विनंती राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. तथापि, प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी या आरोपाचे जोरदार खंडन केले असून प्रामाणिक यांचा जन्म आणि शिक्षण भारतातच झाले आहे, असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बराक बांगला आणि रिपब्लिक टीव्ही त्रिपुरा अ‍ॅण्ड डिजिटल मीडिया, इंडिया टुडे आणि बिझनेस स्टॅण्डर्ड या वृत्त वाहिन्यांनी प्रामाणिक हे बांगलादेशचे नागरिक असल्याचे म्हटले आहे, असा दावा बोरा यांनी पत्रामध्ये केला आहे. बोरा यांनी हे पत्र आपल्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केले आहे.

प्रामाणिक यांचा जन्म बांगलादेशच्या गाईबंधा जिल्ह्यातील हरिनाथपूर येथे झाला आणि ते संगणकाच्या शिक्षणासाठी पश्चिम बंगालमध्ये आले असा दावा बोरा यांनी या बाबत आलेल्या वृत्तांच्या हवाल्याने केला. संगणक पदवी मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते कूचबिहारमधून खासदार म्हणून निवडून आले, असा दावाही बोरा यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nisith pramanik is a citizen of bangladesh akp