उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाबत (जेएनयू) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल सुरू आहे. तसेच राहुल गांधींसह काँग्रेसचे बडे नेते आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही तिथे जातात असेही त्यांनी म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे रघुराज सिंह यांनी अमित शाह यांच्या अलीगढ येथील रॅलीदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नेहरूंच्या धोरणानुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना झाली. जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कम्युनिस्ट आणि देशद्रोही वाढले आहेत. देशद्रोही तिथे सेक्स स्कँडल चालवतात, ज्यात राहुल गांधी आणि दीपिका पदुकोणसारखे मोठे लोक जातात. तिथे देशद्रोही लोक जमा होत आहेत, पण येणाऱ्या काळात या देशद्रोही शक्तींना ठेचून काढू,” असे वादग्रस्त वक्तव्य रघुराज सिंह यांनी केले आहे.

रघुराज सिंह यांचे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी मदरशांना लक्ष्य करत वादग्रस्त विधान केले होते. देवाने संधी दिली तर देशातील सर्व मदरसे बंद करीन. मदरशांमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर दहशतवादी विचार फोफावतो, असे वक्तव्य रघुराज सिंह यांनी केले होते.

या विधानावरून वाद वाढत असतानाच मंत्री रघुराज सिंह यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा आधार घेतला होता., “कलाम साहेब म्हणाले होते की मुस्लिम हा जन्मजात दहशतवादी नसतो, जेव्हा तो मदरशात शिकायला जातो तेव्हा त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात,” असे रघुराज सिंह म्हणाले होते.

याआधी रघुराज सिंह यांनीही मथुरा-काशीसंदर्भात वक्तव्य केल्याने राजकारण तापले होते. “भगवान कृष्ण हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत, मथुरा हे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आहे, त्यासाठी त्यांना काही बलिदान द्यावे लागले तर ते देऊ,” असे सिंह म्हणाले होते. “केशव प्रसाद मौर्य यांनी अगदी बरोबर म्हटले आहे की, अयोध्येनंतर काशी ही मथुरेची वेळ आहे. हे आमच्या अजेंड्यावर आहे, त्यात चूक काय आहे,” असेही रघुराज सिंह यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up minister raghuraj singh says sex scandal in jnu rahul gandhi deepika padukone goes there abn