मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करण्याची १९ वर्षाच्या आईची हौस दोन चिमुरड्यांच्या जीवावर बेतली. पार्टी करता यावी यासाठी आईने तिच्या दोन लहान मुलींना तब्बल १५ तासांपेक्षा जास्त काळ कारमध्ये बंद करुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवणाऱ्या मातेला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या अमांडा हॉकिन्सला दोन लहान मुली होत्या. मोठी मुलगी दोन तर छोटी मुलगी फक्त एक वर्षाची होती. वॉलमार्टमध्ये काम करणाऱ्या अमांडा तिच्या मुलांना घेऊन मैत्रिणीच्या घरी पार्टीला गेली होती. मात्र तिच्या घरी जाताना तिने दोन्ही मुलींना कारमध्येच बंद करुन ठेवले. तिच्या मैत्रिणीने तिला मुलींना घरात आणायला सांगितलेही होते. पण अमांडाने तिच्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तिने मित्रमैत्रिणींसोबत पार्टीमध्ये रमली. तब्बल १५ तासानंतर मुलांना घेण्यासाठी ती कारमध्ये परतली. बाहेर ३३ डिग्री तापमान तसेच पाणीदेखील प्यायला न मिळाल्याने दोन्ही मुलांची प्रकृती खालावली. भूक लागल्याने दोन्ही मुली रडत होत्या. पण अमांडाने त्याकडेही दुर्लक्षच केले.

मुलींचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तिने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. पोलिसांनी अमांडाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलांना बेजबाबदारपणे सोडून जाणे किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे या कलमांखाली तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यात दोषी ठरल्यास तिला दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

मुलांच्या निष्काळजीपणाबाबतचा हा सर्वात भयानक आणि धक्कादायक गुन्हा बघितला असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. माझ्या दोन सुंदर आणि गोंडस नातू होत्या. त्यांच्यासोबत जे झाले ते खूप वाईट होते. माझ्या मुलीने जे कृत्य केले ते न पटणारेच आहे अशी भावनिक प्रतिक्रिया अमांडाच्या आईने दिली. पण तरीदेखील माझे माझ्या मुलीवर प्रेम आहे आणि तिच्या मदतीसाठी मी तयार आहे असे त्यांनी म्हटले आहे. मुलांचा मृत्यू झाल्याने तिच्यावरील कलमांमध्ये बदल होऊ शकतो असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us texas teenage mother left toddlers to die inside car for 15 hours while she went out partying