Uttarakhand Private Chopper Crash : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता गंगोत्रीकडे जाणारे एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवासी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हेलिकॉप्टरमध्ये सुमारे सात प्रवासी होते आणि दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, लष्कराचे जवान, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी, रुग्णवाहिका, भटवारीचे बीडीओ आणि महसूल पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानणीजवळ हेलिकॉप्टर अपघात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. “हेलिकॉप्टर अपघातस्थळी प्रशासन आणि मदत पथके उपस्थित आहेत”, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनीही दिली माहिती

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला. तसंच, या घटनेच्या चौकशीचे निर्देश दिल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की ते अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि दाखल्याचे निरीक्षण करत आहेत.

भटिंडा येथील अपघातात एकाचा मृत्यू

दरम्यान, काल (७ मे) मध्यरात्रीही चंदीगडच्या मध्यरात्री भटिंडा येथील हवाई दलाच्या जवळ असलेल्या एका गावात एक विमान कोसळले होते. या अपघातात एका स्थानिकाचा मृत्यू झाला तर, नऊजण जखमी होते. भटिंडा येथील भिसियाना हवाई दलाच्या तळापासून फक्त २० किमी अंतरावर असलेल्या गावाजवळील शेतात हे अज्ञात विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विमान अपघाताचा आवाज येताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघात आणि स्फोटानंतर काही वेळातच काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेची माहिती पंजाब पोलिसांना सर्वात आधी मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सूर्योदयापूर्वी लष्कर आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लष्कराने परिसराला वेढा घातला आणि हवाई दलाने छत उभारले. हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मलबा गोळा करण्यास सुरुवात केली.