अमेरिकेत गेल्या काही काळापासून भारतीय विद्यार्थी मृत्यूमुखी पडत आहेत. जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत तब्बल ११ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत. हे प्रमाण काळजीत टाकणारे असले तरी आता नवी माहिती समोर येत आहे. आता मार्चमध्ये मृत पावलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ८ मार्च रोजी फ्रीटाऊन येथे एका गाडीत २० वर्षीय विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले होते. मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचा खून झाला असावा, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ब्रिस्टॉल काऊंटी डिस्ट्रिक अटॉर्नीचे प्रवक्ते ग्रेग मिलिओट यांनी सांगितले की, सदर मृत्यूचा तपास केला असता हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे समोर आले. सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केलेल्या विनंतीनंतर विद्यार्थ्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

‘अमेरिकन ड्रीम’ दु:स्वप्न का ठरत आहे?

मुळचा आंध्र प्रदेशमधील तरूण ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम खेळत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या गेममुळेच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी ही बाबा पूर्णपणे नाकारलेली नाही आणि याला दुजोराही दिलेला नाही. ग्रेग मिलिओट म्हणाले की, आमच्याकडे अद्याप खात्रीशीर माहिती नाही. मात्र या प्रकरणाचा आत्महत्येच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत.

अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

ब्लू व्हेल चॅलेंज म्हणजे काय?

ब्लू व्हेल चॅलेंज हा आत्मघातकी खेळ असल्याचे याआधीही अनेकदा समोर आलेले आहे. सदर खेळात ५० दिवसांत ५० टास्क पूर्ण करायचे असतात. प्रत्येक दिवसागणिक टास्कमधील काठीण्य पातळी वाढत जाते. शेवटच्या दिवशी टास्कमध्ये खेळणाऱ्याने स्वतःला इजा पोहोचवायची असते. मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू श्वास रोखून धरल्यामुळे झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

भारत सरकारने फार पूर्वीच या खेळावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बंदी घालण्यापेक्षा या खेळाच्या सुरुवातीला सावधानतेचा इशारा देण्याचा निर्णय घेतला गेला. हा खेळ २०१७ साली भारतात आल्यानंतर एका वर्षानंतर भारताच्या माहिता आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ब्लू व्हेल गेम आत्महत्येस प्रवृत्त करणारा आहे, अशी सूचना देणे बंधनकारक केले. २०१५ ते २०१७ या काळात या गेममुळे अनेक मुलांचा मृत्यू झालेला आहे.