१५०० रुपयांचं व्याज दिलं नाही म्हणून एका महिलेला निर्वस्त्र करुन लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. दलित महिलेने १५०० रुपयांचं व्याज दिलं नाही म्हणून तिला नग्न करण्यात आलं आणि त्यानंतर मूत्र प्राशन करण्यासाठीही सक्ती करण्यात आली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा या ठिकाणच्या मोसिमपूर गावात ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घटना घडली?

पीडित महिला रात्री १० च्या सुमारास घराच्या बाहेर असलेल्या नळावर पाणी पित होती. त्यावेळी काही लोक तिथे आले. या महिलेला तुझ्या पतीला आम्ही घेऊन जाऊ असं सांगितलं. त्यानंतर या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या महिलेने पोलिसांना जी माहिती दिली आहे त्यानुसार तिने हे सांगितलं की काही लोक आले, मला खूप मारहाण केली. मारहाण करण्याआधी मला त्यांनी निर्वस्त्रही केलं. मला जी मारहाण केली त्यात माझ्या डोक्याला खोक पडून जखम झाल्याचं पोलिसांना सांगितलं.

पीडित महिलेने काय सांगितलं?

पीडित महिलेने हे सांगितलं प्रमोद सिंह आणि त्यांच्याबरोबर आलेल्या काही लोकांनी मला बळजबरीने मूत्र प्राशनही करायला लावलं. मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि माझ्या घराकडे पळाली. त्यावेळी आमच्या शेजारी राहणारे लोक मला भेटले आणि घरी घेऊन गेले. त्यानंतर आम्ही पोलिसांना कळवलं असंही या पीडितेने सांगतिलं आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला आता आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत तसंच पीडितेचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पीडित महिलेने पोलिसांना जी माहिती दिली त्यात तिने हेदेखील म्हटलं आहे की माझ्या पतीने प्रमोद सिंह यांच्याकडून १५०० रुपये घेतले होते. त्याचं व्याज देऊ शकला नाही म्हणून मला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही महिला आणि तिचं कुटुंब सध्या दहशतीत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman beaten naked forced to drink urine for not paying interest of rs 1500 crime news scj