अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी कमला हॅरीस यांची उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. या पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला असणार आहेत. निवडणुकीत हॅरीस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स यांचे आव्हान असेल. पेन्स सध्या अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरीस यांनी कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणूनही काम केलं आहे. पोलीस सुधारणेच्या त्या कट्टर समर्थक आहेत. 55 वर्षांच्या कमला हॅरीस यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. त्यांच्या आईचा म्हणजे श्यामला गोपालन हॅरीस यांचा जन्म चेन्नईतला. त्या कॅन्सर रिसर्चर होत्या. २००९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर कमला हॅरीस यांच्या वडिलांचा(डोनाल्ड हॅरिस) जन्म जमैकामधला. ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक आहेत. कमला हॅरीस आणि त्यांची धाकटी बहिण माया हॅरीस दोघी लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. कमला हॅरीस यांनी हाॅवर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं. हाॅवर्डनंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्या वकिली व्यवसायात उतरल्या. यानंतर त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या. कमला हॅरीस दोन वेळा अ‍ॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर २०१७ साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.

यापूर्वी अमेरिकेत दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. २००८ साली रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर १९८४ साली डेमोक्रेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही महिलांचा निवडणुकीत पराभव झाला होता. याआधी अमेरिकेला कधीही कृष्णवर्णीय उपाध्यक्ष लाभलेला नाही. त्यामुळे कमला हॅरीस निवडून आल्यास अमेरिकी निवडणुकीत इतिहास रचला जाईल.

 

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamala harris joe bidens vice president choice get detail information sas