विश्लेषण: कोरे कागद घेऊन हजारो चिनी नागरिक रस्त्यावर का उतरत आहेत? A4 Revolution आंदोलनं कशामुळे सुरु झाली? | A4 Revolution How A Blank Sheet Of Paper Has Become Symbol Of Rare Protest In China scsg 91 | Loksatta

Premium

विश्लेषण: कोरे कागद घेऊन हजारो चिनी नागरिक रस्त्यावर का उतरत आहेत? A4 Revolution आंदोलनं कशामुळे सुरु झाली?

What is A4 Revolution: चीनसारख्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात जनआंदोलनं होण्याचे प्रकार फार क्वचित घडतात

विश्लेषण: कोरे कागद घेऊन हजारो चिनी नागरिक रस्त्यावर का उतरत आहेत? A4 Revolution आंदोलनं कशामुळे सुरु झाली?
एकाच वेळी अनेक ठिकाणी आंदोलने (फोटो सौजन्य- रॉयटर्स)

A4 Revolution A Blank Paper Protest In China: कम्युनिस्ट देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये जनआंदोलन आणि जनउद्रेक हा तशा फार दुर्मिळ गोष्टी आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून चीनमधील अनेक भागांमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. यामध्ये राजधानी बिजिंगबरोबरच राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या शांघायसारख्या शहरामध्येही आंदोलनं केली जात आहेत.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सर्वोच्चपदी निवडून आल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर होणारी ही निदर्शने गेल्या काही दिवसांत शांघाय, बीजिंग आणि देशाच्या अनेक भागांत पसरली आहेत. या शनिवारी-रविवारी झालेल्या आंदोलनामध्ये, “शी जिनपींग पायउतार व्हा”, “कम्युनिस्ट पक्षाने पायउतार व्हावे” आणि “शिनजँग अनलॉक करा, चीन अनलॉक करा” अशा घोषणा देण्यात आल्या. चीन सरकारचे वादग्रस्त ‘शून्य कोविड धोरण’ आणि सरकार लागू करत असलेल्या लॉकडाऊनविरोधात देशभरात उसळलेला जनउद्रेक कायम असून हे आंदोलन थोपावण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. चीन सरकारनेही ‘शून्य कोविड धोरणा’वरील चिंता फेटाळून लावल्या आहेत.

बीजिंगमध्ये करोनाबाधितांची ४० हजार प्रकरणे नोंदली गेली असून प्रशासन करोनाचे संक्रमण आणि शी जिनपिंग राजवटीविरोधातील जनआंदोलन रोखण्याच्या कामात गुंतले आहे. या आंदोलनांबरोबरच आणखीन एक गोष्ट लक्ष्य वेधून घेत आहे ती म्हणजे आंदोलनादरम्यान वापरले जाणारे कोरे कागद. अनेक आंदोलक कोरे कागद हातात धरुन निषेध नोंदवत आहेत. करोनासंदर्भातील धोरणं, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चाचण्या, क्वारंटाइनचे नियम आणि लॉकडाऊनविरोधातील आंदोलनासाठी हा कोरा कागद वापरला जात आहे.

सेन्सॉरशीपसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या चीनमधून समोर येणाऱ्या या आंदोलनांच्या व्हिडीओ आणि फोटोंमध्येही अनेक आंदोलक कोरा कागद धरुन पोलिसांना सामोरे जाताना दिसत आहेत. या कोऱ्या कागदांच्या माध्यमातून आम्ही म्यूट मेसेज म्हणजेच काहीही न बोलता बरंच काही बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. अनेकांनी या आंदोलनाला ‘एफोर रेव्हेल्युशन’ असं नाव दिलं आहे. हे कोरे कागद म्हणजे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय असं दर्शवण्याचा प्रयत्न आहे. तसेच आंदोलन चिरडणाऱ्या प्रशासनाकडून होणारी कारवाई ही काहीही न लिहिलेल्या कागदांविरोधात असल्याचंही यामधून अधोरेखित करण्याचा आंदोलकांचा प्रयत्न आहे. काहीही न लिहिलेला कागद धरल्याबद्दल आमच्यावर कारवाई केली जात आहे असंही या आंदोलनातून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मागील आठवड्यामध्ये शीनजँग प्रांताची राजधानी असलेल्या उरमीक येथे लागलेल्या भीषण आगीमुळे आंदोलनाला तोंड फुटलं. या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. एकूण नऊ खोल्यांना आग लागल्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. लॉकडाउनसंदर्भातील निर्बंधांमुळे अग्निशामन दलाच्या जवानांना वेळेत आग लागलेल्या ठिकाणी पोहोचता आलं नाही असा आरोप केला जात आहे. ही घटना घडली तेव्हा उरमीक शहरामध्ये लॉकडाउन होता. मागील १०० हून अधिक दिवसांपासून येथे लॉकडाउन लागू आहे. या प्रांतातील लोकांना प्रांत सोडून जाण्याची परवानगी नाही त्यामुळे अनेकजण घरात अडकून पडले आहेत. आगीच्या घटनेमध्ये १० जणांचा बळी गेल्यानंतर शुक्रवारी या शहरातील हजारो लोकांना सरकारी इमारतींसमोर आंदोलनं केली. लॉकडाउन मागे घ्यावा अशी या लोकांची मागणी होती.

या आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक प्रशासनाने टप्प्याटप्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जातील अशी घोषणा केली. मात्र यासंदर्भात माहिती देताना टप्प्याटप्यात म्हणजे नेमकं कधी आणि कसं याबद्दल काहीही सांगण्यात आलं नाही. त्यामुळे या घोषणेनंतरही जनक्षोभ शांत झाला नाही. उलट हा संताप या शीजँग प्रांताबाहेर पसरला. आताच्या घडीला चीनमधील अनेक शहरांमध्ये रोज आंदोलनं होत आहेत.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार एकूण १६ ठिकाणी ही आंदोलनं सुरु आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठ्या शहरांचाही समावेस आहे. शांघायमध्ये हजारो लोकांनी शनिवारी रस्त्यावर उतरुन आगीच्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या आंदोलनामध्ये अनेकांनी हातात एफोर आकाराचे म्हणजेच साध्या प्रिंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या आकाराचे कागद हातात पकडून निषेध नोंदवला. त्यानंतर रविवारी बिजिंगमधील आघाडीची शिक्षण संस्था असलेल्या शिंग्वा विद्यापिठात आणि लाइंग्मा या नदीला समांतर असलेल्या रस्त्यावर झालेल्या मोठ्या आंदोलनामध्येही हे कोरे कागद दिसून आले.

“हे कोरे पांढरे कागद म्हणजे आम्हाला जे काही म्हणायचं आहे पण ते उघडपणे मांडता येत नाही अशा गोष्टी दर्शवतोय,” असं २६ वर्षीय आंदोलनकर्त्याने सांगितलं. “आगीच्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी येथे आलो आहे. मला खरोखर असं वाटतं की हे करोनासंदर्भातील निर्बंध उठवायला हवेत. आम्हालाही सामन्य आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आम्हाला सन्मानपूर्वक जगू द्या,” असं हा २६ वर्षीय जॉन नावाचा आंदोलक म्हणाला.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सर्वोच्चपदी निवडून आल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर होणारी ही निदर्शने गेल्या काही दिवसांत शांघाय, बीजिंग आणि देशाच्या अनेक भागांत पसरली आहेत. दरम्यान, शांघायमधील निदर्शनांचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या बीबीसी पत्रकाराला अटक करण्यात आली असून चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या अटकेचे समर्थन केले. वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराने त्याचे माध्यम ओळखपत्र सादर करण्यास नकार दिल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे लिजियान म्हणाले. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, सोमवारी ३९,४५२ करोनाबाधितांची नोंद झाली,  ज्यात ३६,३०४ जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र सलग पाचव्या दिवशी बीजिंगमध्ये जवळपाच चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे.

सामान्यपणे चीनमध्ये अशाप्रकारे मोठ्या संख्येने आणि तिही एकाच वेळेस आंदोलनं होत नाही. मागील अनेक दशकांपासून सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचा देशातील राजकारणावर वरचष्मा आहे. चीनने मागील काही वर्षांपासून तंत्रज्ञानाच्या मदतीने सामाजिक आयुष्यातील सर्वच घडामोडींवर नजर ठेवणारी व्यवस्था उभी केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:37 IST
Next Story
विश्लेषण: व्हेनेझुएलामध्ये राजकीय सामोपचारामुळे जगाची कोणती चिंता दूर होईल? या कराराला इतके महत्त्व कशामुळे?