संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिझोरममध्ये सत्ताबदल होऊन झोरम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या सहा छोटे पक्ष आणि नागरी संस्था यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पक्षाला सत्ता मिळाली आहे. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) निवृत्त अधिकारी लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखालील झेडपीएम पक्षाने मिझो नॅशनल फ्रंट या मिझोरममधील पारंपरिक प्रादेशिक पक्षाचा पराभव केल्याने आता ७४ वर्षीय लालदुहोमा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील. मिझोरमला १९८७ मध्ये राज्याचा पूर्ण दर्जा मिळाल्यापासून मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस हे दोनच पक्ष सत्तेत होते. राज्याची अनेक वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.

झेडपीएम पक्षाची निर्मिती कशी झाली?

मिझोरममध्ये छोटे छोटे वांशिक गट आहेत. या गटांच्या विविध संघटना आहेत. मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मुव्हमेंट, झोरम दोन वेगवेगळे फ्रंट, मिझोरम पीपल्स फ्रंट असे सहा छोटे स्थानिक पक्ष तसेच नागरी संस्था यांनी एकत्र येऊन झोरम पीपल्स मुव्हमेंट या पक्षाची २०१७ मध्ये स्थापना केली होती. झोरम याचा अर्थ उंचावरील जागा किंवा दरी (हायलॅण्ड किंवा हायहिल) असा आहे. मिझोरमची फोड ‘मी म्हणजे लोक’ तर ‘झोरम म्हणजे उंचावरील जागा किंवा दरी’ अशी केली जाते. यातूनच झोरम पीपल्स मुव्हमेंट असे पक्षाचे नामकरण झाले.

हेही वाचा >>> विश्लेषण : तेलंगणाच्या रुपात काँग्रेसकडे आणखी एक दाक्षिणात्य राज्य… भ्रष्टाचार, घराणेशाहीचा बीआरएसला फटका?

लालदुहोमा यांची पार्श्वभूमी काय?

लालदुहोमा हे १९७७च्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत. १९८२ मध्ये दिल्लीत झालेल्या एशियाडच्या सुरक्षाव्यवस्थेत त्यांनी भूमिका बजाविली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्यांनी काम केले होते. पोलीस दलाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८४ मध्ये लालदुहोमा हे काँग्रेसच्या वतीने मिझोरममधून लोकसभेवर निवडून आले होते. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पक्षांतरबंदी कायदा लागू झाल्यावर अपात्र ठरणारे लालदुहोमा हे अपात्र ठरणारे पहिले खासदार ठरले होते. पुढे मिझोरम विधानसभेत पक्षांतरबंदी कायद्यान्वये त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. अपक्ष म्हणून निवडून येऊनही झेडपीएमचे अध्यक्षपद भूषविल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली होती. 

पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत?

झेडपीएम पक्षाची ध्येयधोरणे ही आम आदमी पार्टीच्या सुरुवातीच्या धोरणांनुसारच आहेत. या पक्षात नागरी संस्थांच्या सदस्यांचा सहभाग असल्याने ‘भ्रष्टाचारमुक्त सरकार’ अशी पक्षाची मुख्य घोषणा आहे. असंघटित कामगारांना मदत, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विकासावर भर अशी विविध आश्वासने या पक्षाने दिली होती. दारूबंदीचे आश्वासनही या पक्षाने स्थापनेच्या वेळी दिले होते. या पक्षाने विधानसभेच्या ४० पैकी २७ जागा जिंकल्या आहेत.

हेही वाचा >>> काँग्रेसचा तीन राज्यांत पराभव, भाजपाचा बोलबाला; लोकसभा निवडणुकीसाठी गणितं बदलणार?

मिझोरमच्या निकालाची वैशिष्टय़े काय?

मिझोरममध्ये अनेक वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. पक्षाचा फक्त एकच उमेदवार निवडून आला आहे. याउलट ख्रिश्चनबहुल मिझोरममध्ये भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. म्हणजेच भाजपने ईशान्येकडील आणखी एका राज्यात काँग्रेसला नमविले आहे. भाजपचे दोन्ही आमदार मिश्र वस्ती असलेल्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपने अशाच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले होते. गेल्या वेळी जिंकलेली बौद्ध- चकमाबहुल तुईचावंग मतदारसंघाची जागा मात्र भाजपने यंदा गमावली आहे. मिझो नॅशनल फ्रंट या सत्ताधारी पक्षाचा धुव्वा उडाला. मावळते मुख्यमंत्री झोरामथंगा हे राजधानी ऐझॉल मतदारसंघातून पराभूत झाले. मिझो नॅशनल फ्रंट हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष आहे. मिझो नॅशनल फ्रंटच्या पराभवामुळे भाजपलाही धक्का बसला आहे. ईशान्येकडील अन्य एका राज्यात आमदारांचे संख्याबळ वाढल्याचे भाजपला अधिक समाधान आहे. झेडपीएम या नवीन सत्ताधारी पक्षाचे भाजपशी कसे संबंध राहतात हे लवकरच स्पष्ट होईल. मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराचे मिझोरमच्या निकालावर परिणाम झाल्याचे दिसते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटने कुकींची बाजू उचलून धरत विस्थापित झालेल्या या समाजाच्या नागरिकांना मिझोरममध्ये आश्रय दिला होता. पण भाजपशी असलेल्या त्यांच्या जवळिकीमुळे मिझोरममधील नागरिकांनी सत्ताधारी पक्षाला टाळून नवीन झोरम पीपल्स मुव्हमेंटला कौल दिला आहे.

santosh.pradhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis zoram people s movement come to power in mizoram print exp zws