Premium

विश्लेषण : युरियाचा वापर रोखणार कसा ?

खतांच्या या अतिवापरामुळे जमिनीत पिकांच्या पोषणासाठी असणाऱ्या जिवाणूंची संख्या वेगाने कमी होत आहे

use of urea
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात २०१९-२० या आर्थिक वर्षांत ३३६.९६ लाख टन युरियाचा वापर देशात झाला होता.

दत्ता जाधव
सेंद्रिय शेतीबद्दल राजकीय नेत्यांनी भाषणांतून कितीही सल्ले दिले, इतकेच काय पण अर्थसंकल्पात रासायनिक खतांवरील अनुदाने कमी केली, तरीही देशातील शेती क्षेत्रात युरियाचा वापर वाढतोच आहे. युरियाच्या वापरात उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्या तर ‘गव्हाचे कोठार’ मानला जाणारा पंजाब दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचेही नाव वरच्या पाचात आहे. असे का होते? धोके माहीत असूनही युरियाच का वापरला जातो?

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

युरियावर विसंबणारी राज्ये कोणती?

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात २०१९-२० या आर्थिक वर्षांत ३३६.९६ लाख टन युरियाचा वापर देशात झाला होता. त्यात वाढ होऊन २०२०-२१ मध्ये ३५०.५१ लाख टनांवर गेला. २०२१-२२ मध्ये वापर कमी होऊन ३४१.७३ लाख टनांवर गेला आहे. युरियाचा सर्वाधिक वापर उत्तर प्रदेशात होतो, पण त्याखालोखाल पंजाबमध्ये युरियाचा वापर मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे समोर आले आहे. पंजाबात २०१९-२० मध्ये २९.६४ लाख टन, २०२०-२१ मध्ये २९.३७ लाख टन आणि २०२१-२२ मध्ये ३१.३४ लाख टनांवर वापर झाल्याची अधिकृत माहिती आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान अशा क्रमाने युरियाचा वापर करणारी राज्ये आहेत. 

पंजाबातील परिणाम काय?

सिंचनाच्या सोयी-सुविधा वाढल्यामुळे उपलब्ध जमिनीपैकी सुमारे ९५ टक्के जमीन बागायती शेतीखाली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले. दरडोई उत्पन्न वाढले. मात्र, मजूरटंचाई निर्माण झाल्यामुळे शेतीत विषारी तणनाशकांचा वापर, युरियासह अन्य रासायनिक खतांचा बेसुमार वापर होऊ लागला आहे. विषारी तणनाशकाचे अंश गहू किंवा तांदळामध्ये उतरलेले दिसतात. पंजाबच्या रोपड (रूपनगर) जिल्ह्यातील काही तरुणांच्या रक्तात तणनाशकाचे अंश सापडले आहेत. संगरूर जिल्ह्यात कापसावर मारलेल्या जंतुनाशकांचा आणि खतांचा अंश जमिनीत आणि पाण्यात उतरताना दिसत आहे. परिणामी संगरूरच्या रहिवाशांत कर्करोगांचे प्रमाण वाढत चालल्याचा दावा पर्यावरणविषयक संघटना करीत आहेत. खतांच्या या अतिवापरामुळे जमिनीत पिकांच्या पोषणासाठी असणाऱ्या जिवाणूंची संख्या वेगाने कमी होत आहे. परिणामी रासायनिक खते वापरली तरच पिके चांगली येतात. मात्र यामुळे जमिनीची अंगभूत उत्पादकता, सुपीकता जवळपास नष्टच झाली आहे. त्याचा परिणाम मानवासह, पशू आणि शेतीआधारित पर्यावरणावर स्पष्टपणे दिसून येतो आहे.

हे ही वाचा >> युरिया जिरवण्यात पाच राज्ये पुढे; निम्म्या उत्पादनाचा वापर; जमिनीच्या भविष्यातील दर्जाबाबत प्रश्न

शेतकरी युरियाच का वापरतात?

युरिया खत इतर खतांच्या तुलनेत स्वस्त असते. त्याचा वापर करताच कमी काळात पिकांवर काळोखी दिसते, पिके जोमाने वाढताना दिसतात, त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती युरियाला असते. नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर सर्वाधिक जास्त ५९ टक्क्यांपर्यंत असतो. त्याखालोखाल अमोनिअम व कॅल्शिअम नायट्रेटचा वापर होतो, पण त्याचे प्रमाण फक्त २ टक्केच शेतकरी करतात. युरियामध्ये ४६ टक्के अमाइड नत्र असते. खत पांढरे शुभ्र दाणेदार आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते. युरिया आम्लधर्मीय आहे. युरियामध्ये २०.६ टक्के ऑक्सिजन, २० टक्के कार्बन, ७ टक्के हायड्रोजन आणि १ ते १.५ टक्के बाययुरेट हे मुख्य उपघटक असतात. एकूण कमी किंमत, सहज उपलब्धता आणि लवकर परिणाम दिसत असल्यामुळे शेतकरी युरिया जास्त वापरतात.

युरियाच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम काय?

पिकांना केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा येतो. परिणामी रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. अतिरेकी वापरामुळे उत्पादनात वाढ होण्याऐवजी घटच येते. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या वेगाने घटते. पालाश, कॅल्शिअम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊन शेती उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतात. जमिनीतील गांडुळाच्या संख्येवर परिणाम होतो. भूगर्भातील पाण्याचा दर्जा खालावतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते. जलचर प्राण्यांची हानी होते. पाण्यातील शेवाळ व पाणवनस्पतींची वाढ होते. यासह युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. त्यातून नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू तयार होतात. ते हवेचे प्रदूषण वाढवतात. हे वायू कार्बन डायऑक्साइडपेक्षा कित्येक पटीने घातक आहेत. ओझोनच्या स्तरास छिद्रे पडून, सूर्यापासून येणारी अतिनील किरणे थेट जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. तापमान वाढ आणि एकूणच पर्यावरणाची मोठी हानी होते.

नीम-वेष्टित युरिया, नॅनो युरियाचा पर्याय?

युरियाचा गैरवापर होऊ लागल्यानंतर नीम-वेष्टित (नीम कोटेड) युरियाच्या उत्पादनावर भर देण्यात आला. नीम-वेष्टित युरियाचा वापर केल्यास युरिया कमी लागतो आणि सुमारे दहा टक्के युरियाची बचतही होते. नीम-वेष्टित युरिया पाण्यात लगेच विरघळत नाही. त्यामुळे पिकांच्या मुळांना दीर्घकाळ, गरजेप्रमाणे युरिया मिळत राहतो. परिणामी शेती उत्पादनात पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होते. ‘नॅनो युरिया’ म्हणजे सूक्ष्म युरिया आता उपलब्ध आहे. आजवर वापरल्या जाणाऱ्या युरिया इतकीच कार्यक्षमता नॅनो युरियात आहे. ४५ किलो वजनाच्या पोत्यात सामावले जाणारे घटक किंवा क्षमता केवळ ५०० मिलिलिटरच्या ‘नॅनो युरिया’च्या बाटलीतून मिळू शकते. याचा वापर अगदी अचूक असल्याने त्याचे शेती, जमीन, हवा, पाणी, असे पर्यावरणावर दुष्परिणाम कमी आहेत. त्यासाठी येणारा खर्चही कमी आहे. देशांतर्गत उत्पादन असल्याने त्यावर होणारा परकीय चलनाच्या खर्चातही बचत होत आहे. चाचण्यांनंतर आता नॅनो युरिया बाजारात आला आहे. त्यानुसार एकूण खत वापरात ५० टक्के बचत होते.

dattaatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explain problems in the use of urea disadvantages of urea fertilizer print exp 0622 zws

First published on: 27-06-2022 at 04:30 IST
Next Story
विश्लेषण : मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला एवढं महत्त्व का? पगार किती मिळतो? निवड कशी केली जाते? जाणून घ्या सविस्तर