विश्लेषण: नितीशही रालोआतून बाहेर पडतील? बिहारचे राजकारण वेगळ्या वळणावर!

पाच वर्षांपूर्वी संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार हे राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या गोटात आले

विश्लेषण: नितीशही रालोआतून बाहेर पडतील? बिहारचे राजकारण वेगळ्या वळणावर!
जनता दलाच्या नाराजीची कारणे कोणती?

हृषिकेश देशपांडे

काही दिवसांपूर्वी पाटण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ ची लोकसभा तसेच २०२५ मधील बिहार विधानसभा निवडणूक भाजप व संयुक्त जनता हे एकत्र लढतील असे जाहीर केले. मात्र आमचे काही ठरलेले नाही, राजकारणात उद्या काही होईल हे सांगता येत नाही, असे वक्तव्य संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांनी रविवारी केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांची ही वक्तव्ये परस्परविरोधी आहेत. यातून बिहारचे राजकारण पुन्हा वेगळ्या वळणावर आले असावे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पाच वर्षांपूर्वी संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार हे राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या गोटात आले. या काळात या दोन्ही पक्षांमध्ये संवादापेक्षा विसंवादच अधिक दिसला.

जनता दलाच्या नाराजीची कारणे कोणती?

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या तीन आठवड्यांत रविवारी चौथ्यांदा केंद्राच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यांनी करोनाचे कारण दिले असले तरी, रविवारीच पाटण्यात ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना मात्र हजर राहिले. दोन वर्षांपूर्वी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे संख्याबळ ७१वरून ४३ वर आले. तर आघाडीत भाजप मोठा भाऊ झाला. लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी जनता दलाच्या पराभवात हातभार लावला, त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता अशी जनता दलात भावना होती. त्यामुळे काहीशा नाराजीनेच नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. संख्याबळात भाजप जवळपास दुप्पट असल्याने मंत्रिमंडळावर त्यांचा प्रभाव साहजिकच होता. यात ठिणगी पडली ती आर.सी.पी. सिंह यांच्यावरील कारवाईने. सिंह हे एके काळी नितीशकुमार यांचा उजवा हात मानले जात. केंद्रीय मंत्रिमंडळात ते संयुक्त जनता दलाचे प्रतिनिधित्व करत होते. ते जनता दलापेक्षा भाजपच्या गोटात गेल्याची धारणा पक्षनेतृत्वाची झाली. त्यातून त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली गेली. साहजिकच संसद सदस्य नसल्याने आर.सी.पी. यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांच्या मालमत्तांवरून वाद झाला. कारवाईही झाली. सिंह यांनी जनता दलाचे वर्णन ‘बुडती नौका’ असे करत पक्षत्यागही केला. या साऱ्या प्रकारांत बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट अटळ मानली जाते. याखेरीज हिंदुत्वावरून भाजपच्या दुसऱ्या फळीतील काही नेत्यांच्या वक्तव्यावरून नितीश नाराज असल्याचे मानले जाते. शिवाय राज्यातील २०० विधानसभा मतदारसंघांत पक्षवाढीच्या भाजपच्या कार्यक्रमाच्या घोषणेबाबत नितीश संतापले असून, भाजप राज्यातील सर्व २४३ जागा लढविण्याची तयारी करत असल्याचे जनता दलाचे म्हणणे आहे. ही नाराजीची काही प्रमुख कारणे मानली जात आहेत.

पुढे काय?

बिहारमध्ये महाआघाडीत नितीशकुमार हेच निर्विवाद नेते होते. मात्र आता वयोमानानुसार नितीशकुमार यांच्यावर काही मर्यादा आहेत. त्यांच्या पक्षाची संघटनात्मक स्थितीही तितकीशी चांगली नाही. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलात तेजस्वी यादव यांनी भाजप- संयुक्त जनता दल आघाडीविरोधात एकहाती किल्ला लढवला होता. सत्ता आली नसली तरी सर्वाधिक जागा जिंकण्याची किमया त्यांनी करून दाखविली होती. त्यामुळे उद्या नितीश त्यांच्याबरोबर गेले तरी तेजस्वी मुख्यमंत्रीपद सहजासहजी सोडतील अशी सध्याची स्थिती नाही. त्यातही तडजोड केली तर पुढील वेळी ते शब्द घेतील. मात्र राजकारणात उद्याचे काय सांगता येत नाही. अर्थात भाजपपासून दूर व्हायचे असेल तर नितीश यांना राजदशिवाय पर्याय नाही. कारण केवळ काँग्रेसशी आघाडी करून राज्यात सत्ताबदल करणे अशक्य आहे. त्यामुळे नितीश संधीची वाट पाहत आहेत.

भाजपची कोंडी कशी होत आहे?

जनता दलाला दुखावणे म्हणजे एक मोठे राज्य हातातून जाणे हे भाजप जाणून आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. संयुक्त जनता दल-राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस एकत्र आल्यास टिकाव लागणे कठीण असल्याचा अनुभव भाजपने घेतला आहे. या पक्षांचे जातीय समीकरण भेदणे भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळेच नितीशकुमार हेच बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते असल्याचा पुनरुच्चार भाजपचे नेते वारंवार करत आहेत. मात्र चिराग पासवान यांनी विधानसभेला उमेदवार उभे करणे असो वा आर.सी.पी. सिंह यांची भाजपशी जवळीक यातून जनता दलाच्या विरोधात षड्यंत्र रचल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात संयुक्त जनता दल जाणार नसल्याची घोषणाही पक्षाने केली आहे. थोडक्यात भाजपपासून दूर होण्याचे सारे नेपथ्य तयार आहे. घोषणेचीच काय ती प्रतीक्षा. मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक आहे. आघाडी तोडल्याचे खापर आपल्यावर येऊ नये याची काळजी संयुक्त जनता दल तसेच नितीशकुमार घेत आहेत. भाजपशी आघाडी तुटल्यावर छाप्यांची कारवाई तसेच जुनी काही प्रकरणे बाहेर येण्याची धास्ती काही आमदारांना आहे. मात्र या साऱ्यात भाजपविरोधी आघाडीला नितीशकुमारांसारखा अनुभवी नेता मिळणार आहे. अर्थात नितीशकुमारांचे याबाबत मौनच आहे. पडती बाजू घेत भाजपच्या नेतृत्वाशी नितीशकुमार काही तडजोड करणार काय, हा मुद्दा आहे. अन्यथा बिहारच्या राजकारणातील पाच वर्षांपूर्वीच्या राजकारणाची पुनरावृत्ती होणे अटळ आहे. भाजपविरोधी राजकारणात नेहमी केंद्रस्थानी राहणाऱ्या लालूप्रसादांऐवजी आता त्यांचे पुत्र तेजस्वी यांच्याकडे ही धुरा आली आहे हा बदल आहे. एकूणच नितीशकुमार यांच्या भाजपपासून अंतर ठेवण्याच्या कृतीने बिहारच्या राजकारणात काही तरी वेगळे घडण्याचे संकेत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained jdu nitish kumar may end alliance with bjp in bihar print exp sgy

Next Story
विश्लेषण : ‘तलाक-ए-हसन’ काय आहे? मुस्लिम महिला याला विरोध का करत आहेत?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी