सागर नरेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाकडे पाहिले जाते. या मेट्रो १२ मार्गिकेचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. या मार्गामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य उपनगरे थेट कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि नवी मुंबईशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे हा मार्ग महत्त्वाकांक्षी मार्ग म्हणून पाहिला जातो आहे. येत्या दोन आठवड्यांत त्याचे सर्वेक्षण पूर्ण होईल.

कल्याण-तळोजा हा मेट्रो मार्ग का महत्त्वाचा ठरणार?

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाला डोंबिवलीमार्गे तळोजा आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी हा मेट्रो मार्ग महत्त्वाचा आहे. कल्याण, डोंबिवली, मानपाडा, कल्याण तालुक्यातील गावे, येथील काही गृहसंकुले आणि त्यापुढील गावे थेट मेट्रोने जोडली जाणार आहेत. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील प्रवासीही या मार्गाचा वापर करू शकतील. या भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचीही संकुले आहेत. खोणीजवळ म्हाडाच्या माध्यमातून उभारण्यात आलेली सुमारे दोन हजार घरांची वसाहत आहे. काटई-कर्जत राज्यमार्गावर पुढे अंबरनाथ, बदलापूर या शहरांनाही या मार्गाचा फायदा होण्याची आशा आहे. भविष्यात हा मार्ग डोंबिवली-बदलापूर मेट्रो मार्गाला पूरक ठरेल.

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांना हा मार्ग कसा जोडतो?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईसह ठाणे आणि ठाणेपल्याड कल्याण, डोंबिवली शहरांसााठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली, कल्याण तालुक्यातील काही गावे आणि पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुबंई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आग्रही आहेत. गेल्या महिन्यात खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना पत्र लिहून या मार्गाच्या कामाला गती देण्याची आवाहन केले होते. त्यानंतर एमएमआरडीएच्या वतीने या मार्गाच्या प्रकल्प सल्लागाराची तातडीने नेमणूक केली होती.

सध्या या प्रकल्पाचे काम कोणत्या स्थितीत आहे?

सप्टेंबर महिन्यात एमएमआरडीए मुख्यालयात झालेल्या बैठकीत या मार्गाचे सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन महानगर आयुक्तांनी दिले होते. याच महिन्यात एमएमआरडीएच्या वतीने या सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली. हे काम आता निम्म्याहून अधिक पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा दावा एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच या मार्गाच्या पुढील टप्प्यातील कामाला सुरुवात केली जाईल.

कसा आहे हा कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग? कधीपर्यंत पूर्ण होणार?

कल्याण-तळोजा हा मेट्रो मार्ग २० किलोमीटरचा असून यात १७ स्थानके आहेत. संपूर्ण उन्नत मार्ग असलेल्या या मेट्रोचे काम २०२४पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. यासाठी सुमारे ३० हेक्टर जमीन लागण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०१९मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained kalyan taloja metro project to have impact in mmr region print exp sgy