जगभरामध्ये करोनाच्या साथीने थैमान घातलेलं असतानाच आता जगासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये घातक अशा मारबर्ग विषाणूचा संसर्ग झालेला पाहिला रुग्ण आढळून आला आहे. जागितक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओने यासंदर्भातील माहिती दिली आहे. हा विषाणू इबोला आणि करोनापेक्षाही अधिक घातक असल्याचं मानलं जात आहे. या विषाणूचा संसर्ग प्राण्यांमधून मानवामध्ये होऊ शकतो. मारबर्गचा रुग्ण आढळून आल्याने गिनीमधील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की कुठे सापडला रुग्ण?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा संसर्ग वटवाघळांच्या माध्यमातून होते. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मरण पावण्याचं प्रमाण हे ८८ टक्के इतकं आहे. २ ऑगस्ट रोजी दक्षीण गुएकेडॉ प्रांतामध्ये एका रुग्णाचा या विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यनंतर केलेल्या चाचण्यांमध्ये त्याच्या शरीरात हा विषाणू आढळून आला. शवविच्छेदन अहवालामध्ये या व्यक्तीच्या शरीरात इबोलाचा विषाणू आढळून आला नसल्याचं उल्लेख आहे. इबोलाऐवजी या व्यक्तीच्या शरीरात मारबर्ग विषाणू आढळून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं काय?

आफ्रीकेमधील जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय निर्देशक डॉक्टर मात्शिदिसो मोएती यांनी यासंदर्भातील माहिती दिलीय. “मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला ततडीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे,” असं मोएती म्हणाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने गिनीमधून इबोलाचं समूळ उच्चाटन झाल्याची घोषणा केली होती. मात्र आता मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचे वृत्त समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. मागील वर्षी करोनासोबतच येथे इबोलाचीही साथ पसरली होती. या साथीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने येथे विशेष मोहीम राबवली होती. मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचा धोका क्षेत्रीय स्तरावर अधिक असून जागतिक स्तरासंदर्भात धोका कमी असला तरी खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे.

“आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांसोबत काम करतोय. ज्यांनी इबोलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्षात फिल्डवर उतरुन काम केलं आहे त्यांना अनुभव असल्याने त्यांचा फायदा होईल. तसेच तज्ज्ञांची आम्ही मदत घेत असून विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असं मोएती म्हणाले आहेत. गिनी सरकारनेही यासंदर्भात एक पत्रक काढून मारबर्गचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं म्हटलं आहे.

या विषाणूच्या संसर्गाचा इतिहास काय?

मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचा विस्फोट प्रामुख्याने मारबर्ग आणि फ्रॅकफर्ट या जर्मनीमधील दोन ठिकाणी तसेच सर्बियामधील बेल्गार्डेमध्ये १९६७ साली झालेला. युगांडामधून अभ्यासाठी आणलेल्या आफ्रीकन ग्रीन मंक म्हणजेच आफ्रीन माकडांपासून या आजाराचा मानवाला संसर्ग जालेला. त्यानंतर अंगोला, रिपब्लिक ऑफ काँगो, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्येही या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आलेले. युगांडामध्ये भेट दिलेल्या दोन पर्यंटकांनाही २००८ साली या विषाणूचा संसर्ग झालेला.

संसर्ग कसा होतो?

गुहा आणि खाणींमध्ये फार काल राहिल्यास, वटवाघळांच्या संपर्कात आल्यास या विषाणूचा संसर्ग होतो. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला की त्याच्या माध्यमातून इतरांनाही हा संसर्ग होऊ शकतो. थेट स्पर्शाने किंवा रक्तामधून, शरीरामधून निणारे द्रव्य (थुंकी, घाम, लघवी इत्यादी) तसेच संसर्गजन्य व्यक्तीचा स्पर्श झालेल्या पृष्ठभागातून आणि वस्तूंमुळेही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या आजाराची लक्षणं काय आहेत?

> या विषाणूचा संसर्ग झाल्याचं लगेच लक्षात घेत नाही.

> अचानक ताप येणे, डोकेदुखी, मळमळल्यासारखं होणे. अंगदुखी, डायरिया, पोटदुखी, उलट्या होणे यासारखे त्रास तिसऱ्या दिवशी सुरु होतात.

> हळूहळू व्यक्तीच्या दिसण्यामध्ये फरक जाणवू लागतो. थकलेले डोळे, डोळे खोल जाणे, चेहऱ्यावरील हावभाव कमी होणे, फार आळस येणे.

> संसर्ग झाल्यानंतर दोन ते सात दिवसांमध्ये त्वचेवर रॅशेस येतात. मात्र अंगाला खाज सुटत नाही.

> वेळीच उपचार न मिळाल्यास रक्तस्त्राव सुरु होतो.

> रक्ताच्या उलट्या होणे, शौचामधून रक्त पडणे अशी लक्षणं दिसू लागलात.

> तसेच नाक, हिरड्या आणि योनीमधूनही रक्त पडू लागतं

> अगदी गंभीर प्रकरणांमध्ये मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. अशी व्यक्ती गोंधळल्यासारखी वागू लागते.

> संसर्ग झाल्यास उपचार न मिळाल्यावर आठ ते नऊ दिवसात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सामान्यपणे अती रक्तस्राव आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे मृत्यू होतो.

> सामान्यपणे या आजाराचा संसर्ग लगेच समजून येत नाही. मात्र काही विशिष्ट चाचण्यांच्या आधारे या विषाणूच्या संसर्गाची खात्री करुन घेता येते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained marburg virus disease overview history symptoms scsg