विश्लेषण : रुपया ऐतिहासिक नीचांकावर; सर्वसामान्य भारतीयांसाठी का आहे ही डोकेदुखी?

तज्ज्ञांच्या मते अवमूल्यन झालेल्या रुपयामुळे आयात खर्च वाढतो, त्यामुळे महागाई भडकते आणि महागाई सर्व बाजारांसाठी वाईट असते

गुरुवारी रुपया या भारताच्या चलनाने डॉलरच्या तुलनेत ७७.७२ इतका ऐतिहासिक नीचांक गाठला असून गेल्या वर्षभराचा विचार केला तर डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल सहा टक्क्यांनी घसरला आहे. वाढती महागाई, विदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारांमधून पलायन आणि बाजारांमध्ये झालेली घसरण अशी अनेक कारणे रुपयाच्या घसरणीमागे आहेत. याचा विपरीत परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असून सद्यस्थितीचा व पुढे काय वाढून ठेवलंय याचा आढावा आपण घेऊया…

रुपया का घसरला?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून रुपया चार टक्के घसरला असून अन्य विकसनशील देशांची चलनेही चार ते सात टक्क्यांनी घसरली आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंताजनक स्थिती असल्यामुळे डॉलरची मागणी वाढतेय परिणामी रुपया नवे नवे नीचांक अनुभवतोय. जगभरातल्या देशांमधून, विशेषत: चीनमधूनही अर्थव्यवस्थेची हलाखी होत असल्याचे चित्र समोर येत असल्याने डॉलर निर्देशांकावर ताण पडला आहे, तो वाढतोय. डॉलर निर्देशांक या दोन दशकांच्या विक्रमी उच्चांकावर सध्या आहे. याचा अर्थ, जेव्हा जगभरातल्या अर्थव्यवस्था बेभरवशी असतात, तेव्हा गुंतवणूकदार अत्यंत सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरला पसंती देतात. “भारतीय बाजारांमधून गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्याचे अनुभवायला येत असून, अमेरिकेतल्या वाढलेल्या व्याजरांमुळेही या प्रक्रियेस गती मिळाली आहे,” मिलवूड केन इंटरनॅशनलचे संस्थापक व सीईओ निश भट्ट यांनी म्हटले आहे.

आयातीच्या खर्चामध्ये हत असलेली वाढ, वाढत असलेली चालू खात्याची तूट रुपयाच्या घसरणीच्या मूळाशी असल्याचे इंडिया रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र पंत सांगतात. एप्रिलमध्ये भारताची व्यापारी तूट २०.१ अब्ज डॉलर्स एवढी होती. म्हणजे, भारताने निर्यात केलेल्या मालाच्या किमतीपेक्षा २०.१ अब्ज डॉलर्स आयात मालासाठी भारताला मोजावे लागले.

याचा काय परिणाम होईल? निर्यात वाढेल का?

तज्ज्ञांच्या मते अवमूल्यन झालेल्या रुपयामुळे आयात खर्च वाढतो, त्यामुळे महागाई भडकते आणि महागाई सर्व बाजारांसाठी वाईट असते. “जर रुपया सुदृढ झाला नाही तर, विदेशी गुंतवणूकदार भारतातून काढता पाय घेत राहतील जी भारतीय बाजारांसाठी तोट्याची बाब असेल. मजबूत डॉलर ही निर्यातदारांसाठी जमेची बाजू आहे. पण आयातीवर भर असलेल्या तेल, वायू, रसायने आदी क्षेत्रातील कंपन्यांसाठी ही डोकेदुखी आहे.,” जीसीएल सेक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांनी सांगितले.

तेल व अन्य वस्तू महाग झाल्या तर एकूणच महागाई आणखी वाढते. भारत आपल्या गरजेच्या ८६ टक्के इतके इंधनासाठीचे तेल आयात करतो. त्यामुळे ऑटो, रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसेल. त्यातल्या त्यात माहिती तंत्रज्ञान व बँकांना या स्थितीचा लाभ होण्याची आशा आहे. विदेशी जाणाऱ्या पर्यटकांना व विद्यार्थ्यांना आधीच्या तुलनेत जास्त डॉलर्स मोजावे लागतील ही तोट्याची बाब आहे ती वेगळीच.

निर्यातदारांना फायदा होईल पण त्यालाही मर्यादा आहेत. कारण डॉलरच्या तुलनेत सर्वच चलने घसरली असल्यामुळे होणारा फायदा मर्यादित असेल असे तज्ज्ञांचे मत आहे. कार्यक्षमता वाढवणे, उत्पादन किंमत करणे आणि अन्य स्पर्धक निर्यातदार देशांच्या तुलनेत सरस कामगिरी करणे निर्यातदारांसाठी कळीचे ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय बाजारांवर काय परिणाम होणार?

रुपयाची घसरण ही शेअर बाजारासाठी कधीच चांगली बाब नसते. यामुळे विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्समधून काढता पाय घेतात. यामुळे एकूणच कंपन्यांचे समभाग व म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचा ओघ आटतो. विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन आणि त्यामुळे रुपयाची होणारी आणखी घसरण हे दुष्टचक्र असून भारतीय गुंतवणूकदारांना याचीच धास्ती असल्याचे सध्या दिसत आहे.

सध्याची डॉलरची भक्कम स्थिती बघता, नजीकच्या काळात रुपया कमकुवत राहण्याची शक्यता दिसत असल्याचे एका तज्ज्ञाने सांगितले. चीनमध्ये पुन्हा लॉकडाउन सदृष स्थिती असून युक्रेनच्या युद्धाचा अंतही दृष्टीपथात नाही, या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार डॉलरवरच विसंबून राहतील व रुपया अशक्तच राहील असा तज्ञ्जांचा अंदाज आहे. रुपयाचे आणखी अवमूल्यन होऊन तो प्रति डॉलर ७८ रुपयाच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज एलकेपी सेक्युरिटीजचे सीनियर रीसर्च अॅनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे. एकूणच येता काळ रुपयासाठी व पर्यायाने महागाईत्रस्त भारतीयांसाठी खडतर असल्याचे चिन्ह आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained rupee hits historic low this could be a problematic for common man asj

Next Story
विश्लेषण : मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसची पन्नाशी!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी