Kailash Mansarovar Yatra may resume soon: परराष्ट्र मंत्रालयाने, २०२० साली बंद झालेली कैलास मानसरोवर यात्रा यंदाच्या वर्षी सुरु होणार असल्याचं अलीकडेच जाहीर केलं. गेल्या काही महिन्यात भारत-चीन संबंधातील सुधारणा ही या निर्णयामागची पार्श्वभूमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत- चीन संबंधात हळूहळू सुधारणा

ही यात्रा बंद होण्यामागे करोनाचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण होते. मात्र याच कालखंडात गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या आगळीकीनंतर वातावरण तणावपूर्ण झाले. भारत-चीन संबंधातील कटुता वाढत गेल्याने पुन्हा यात्रा सुरू करण्याचे लांबणीवरच पडत गेले. २०२० साली झालेल्या चकमकीने दोन्ही देशांच्या संबंधाची दरी अधिकच वाढत गेली. परंतु, गेल्या वर्षांपासून हे संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. २०२४ साली ऑक्टोबरमध्ये त्यांनी डेमचोक आणि डेपसांग या सीमावादाच्या ठिकाणी माघार घेण्याचा करार केला.

मोदी- जिनपिंग भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची कझानमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेत अनौपचारिक भेट झाली. ही यात्रा पुन्हा सुरु व्हावी, यासाठी डिसेंबर महिन्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात विशेष प्रतिनिधी बैठक झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या बीजिंग भेटीनंतर दोन्ही देशांनी तत्त्वतः यात्रा पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवली. या संबंधित अधिकृत निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या विशेष प्रतिनिधी बैठकीपूर्वी या मुद्द्यावर तोडगा निघावा, अशी दोन्ही देशांची इच्छा आहे.

मानसरोवर यात्रा

मानसरोवर हे स्थानिक पातळीवर मापाम युमत्सो म्हणून ओळखलं जातं. हे सरोवर तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील नगरी प्रिफेक्चरमध्ये (Ngari Prefecture) कैलास पर्वताजवळ असलेलं एक उंचावरील गोड्या पाण्याचं सरोवर आहे. हे सरोवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४,६०० मीटर उंचीवर आहे. तर त्यासमोरील पर्वत हा ६,६३८ मीटर उंच आहे. हा पर्वत हे भगवान शिवाचे निवासस्थान आहे, अशी हिंदूधर्मीयांची श्रद्धा आहे. हा परिसर जगातील सर्वाधिक पवित्र स्थान असल्याची हिंदू, बौद्ध, जैन आणि तिबेटीयन बोन धर्मींची धारणा आहे. दरवर्षी हजारो भाविक या स्थळास भेट देतात.

कैलास परिक्रमा

मानसरोवरापर्यंत भाविक ट्रेक करतात आणि त्यानंतर कैलास पर्वताची परिक्रमा करतात. २०२० पर्यंत जून ते सप्टेंबर महिन्यात या यात्रेचं आयोजन करण्यात येत होतं. ही यात्रा २३ ते २५ दिवसांची असते. वैध भारतीय पासपोर्टधारक निरोगी व्यक्ती ही यात्रा करू शकते. यात्रेकरूचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ७० वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक असे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत नोंदणी सुरू होते. त्यानंतर सोडत काढून मर्यादित जागा भरल्या जातात. या यात्रेचा एकूण खर्च दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असतो. यावर्षीच्या यात्रेचे तपशील परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

दोन मार्ग (How to reach Kailash Mansarovar from India)

भारताकडून मानसरोवर सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी लिपुलेख पास मार्ग आणि नाथूला पास मार्ग असे दोन मुख्य मार्ग आहेत.

लिपुलेख पास मार्ग:

लिपुलेख पास ही समुद्रसपाटीपासून ५,११५ मीटर उंचीवर असलेली एक खिंड आहे. ही खिंड उत्तराखंड आणि तिबेट स्वायत्त प्रदेश (TAR) यांच्या सीमेवर नेपाळच्या त्रिसंधीच्या जवळ स्थित आहे. हा भारतीय उपखंड आणि तिबेटी पठार यांच्यातील एक प्राचीन मार्ग असून व्यापारी आणि भाविक दोघेही याचा वापर करत असतं.

लिपुलेख मार्ग हा भारताकडून मानसरोवरला पोहोचण्यासाठी सर्वात थेट मार्ग आहे. सरोवर सीमेपासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. मात्र, भूभाग खडतर असल्यामुळे हा प्रवास अत्यंत कठीण मानला जातो. सध्या या मार्गामध्ये सुमारे २०० किमीचा कष्टदायक ट्रेकिंगचा समावेश आहे. हा प्रवासाचा मार्ग १९८१ पासून कार्यरत होता.

नथूला पास मार्ग

नथूला पास ही समुद्रसपाटीपासून ४३१० मीटर उंचीवर असलेली खिंड आहे. ही खिंड सिक्कीम आणि तिबेट स्वायत्त प्रदेश (TAR) यांच्या सीमेवर स्थित आहे. या ठिकाणी दोन पर्वत खिंडी आहेत. पहिली नथूला पास आणि दुसरी आहे जेलेपला आहे. या दोन्ही खिंडींनी प्राचीन काळापासून सिक्कीम आणि तिबेट यांना जोडण्याचे काम केले आहे. नथूला मार्गाने मानसरोवरला जाणारा प्रवास अंतराच्या दृष्टीने खूपच लांब आहे. सुमारे १५०० किलोमीटर आहे. मात्र, हा संपूर्ण मार्ग मोटारीने जाऊ शकण्यासारखा आहे. म्हणजेच भाविकांना ट्रेकिंग न करता सरोवरापर्यंत पोहोचता येतं. (फक्त कैलास पर्वताची परिक्रमा करण्यासाठी ३५ ते ४० किलोमीटर चालावं लागतं). हा मार्ग २०१५ मध्ये कार्यान्वित झाला आहे.

निवास व अन्य व्यवस्था

भारतीय भागात, लिपुलेख मार्गासाठी लॉजिस्टिकची जबाबदारी कुमाऊँ मंडल विकास निगमकडे होती. तर नथूला मार्गासाठी सिक्कीम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे होती. सीमेपलीकडील तिबेट स्वायत्त प्रदेशातील (TAR) अधिकाऱ्यांनी तिथल्या बाजूची निवास व अन्य व्यवस्था केली होती. ही यात्रा बंद राहण्याच्या कारणांमध्ये TAR अधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजूला आवश्यक व्यवस्था न करणं हेही होत. नोंदणी प्रक्रियेदरम्यान, MEAच्या पोर्टलवर भाविकांना कोणता मार्ग निवडायचा आहे हे सुचवता येत असे, मात्र अंतिम मार्ग संगणकीय पद्धतीने ठरवला जात असे. एकदा मार्ग ठरल्यानंतर तो बदलणं फार कठीण असे.

नेपाळमधील मार्ग:

दोन अधिकृत मार्गांवर कोणतेही खासगी ऑपरेटर कार्यरत नाहीत. मात्र, एक तिसरा पर्याय म्हणजे नेपाळमार्गे जाणारा मार्ग. तिथे खासगी कंपन्या कार्यरत असतात. २०२३ साली चीनने नेपाळबरोबर सीमा खुली केल्यानंतर हा मार्ग भारतीयांसाठी खुला आहे. मात्र, व्हिसा आणि परवान्याच्या अटी तसेच चीनकडून आकारले जाणारे जास्त शुल्क यांमुळे फारच कमी भाविकांनी या पर्यायाचा लाभ घेतला. अलीकडच्या वर्षांमध्ये काही एअरलाईन्सने नेपाळमधील नेपालगंज येथून चार्टर्ड फ्लाइट्स सुरु केल्या आहेत. यामुळे भाविकांना कैलास पर्वताचं हवाई दर्शन घेता येतं. भारत सरकारही लिपुलेखजवळील (Lipulekh) धारचुला येथे कैलास दर्शनासाठी विशेष केंद्र विकसित करत आहे. त्यामुळे त्या पवित्र शिखराचं थेट दर्शन घेता येणार आहे.

सकारात्मक संकेत

कैलास मानसरोवर यात्रा ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चार वर्षांच्या खंडानंतर ही यात्रा पुन्हा सुरू होणं, हे केवळ भाविकांसाठीच नव्हे, तर भारत-चीन संबंधांच्या सुधारणेचंही एक सकारात्मक संकेत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kailash mansarovar yatra 2025 what is the connection between india china relations and the kailash mansarovar yatra svs