इथेनॉल निर्मितीची सद्या:स्थिती काय?
देशाची वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमता १,५८९ कोटी लिटरवर गेली आहे. त्यात प्रामुख्याने ऊस, मका, खाण्यायोग्य नसलेले तांदूळ, गहू, विविध प्रकारच्या टाकाऊ कचरा आणि गवतासह अन्य कृषी कचऱ्यापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ही क्षमता १३८० कोटी लिटर होती. त्यांपैकी ८७५ कोटी लिटर इथेनॉल उसाचा रस, पाक आणि मळीपासून आणि ५०५ कोटी लिटर इथेनॉल धान्यापासून तयार होई. जून २०२४ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलची मिश्रणपातळी १५.९० टक्क्यांवर गेली आहे. नोव्हेंबर २०२३ – जून २०२४ दरम्यान एकत्रित इथेनॉल मिश्रण पातळी १३ टक्क्यांवर गेली आहे.
साखर कारखान्यांवरील निर्बंधांचा परिणाम काय?
इथेनॉल उत्पादन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी इथेनॉल किमतीपोटी १.०५ लाख कोटी रुपये ऊसउत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे कारखान्यांना चांगले पैसे मिळाले. २०२१-२२ मधील एफआरपीची ९९.९ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती. २०२२-२३ मध्ये देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपोटी १,१४,५९४ कोटी रुपये देय होते, इथेनॉलचे पैसे वेळेत मिळाल्याने १,१४,२३५ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. एकूण एफआरपीच्या ९९.८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली होती. यंदाच्या संपलेल्या गळीत हंगामात देशभरात सुमारे ४५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा अंदाज होता. पण साखर उत्पादनात घटीच्या अंदाजामुळे यंदा केंद्र सरकारने उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे ३२५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले. उत्पादनात साधारण १२५ कोटी लिटरने घट झाली. इथेनॉलला प्रतिलिटर सरासरी ६० रु. दर गृहीत धरला, तर देशातील साखर उद्याोगाचे सुमारे ७,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. राज्यात ११० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा अंदाज होता. निर्बंधांमुळे प्रत्यक्षात ५७ कोटी लिटर उत्पादन झाले- म्हणजे निम्मी घट. त्यामुळे राज्यातील कारखान्यांचे सुमारे तीन हजार कोटी रु.चे नुकसान झाले.
हेही वाचा >>>ऑलिम्पिक पदकांची खरी किंमत किती? २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक पदकांमध्ये काय वेगळेपण होते?
मक्यापासून इथेनॉल निर्मिती वाढली?
मका कमी पाण्यात येतो. रब्बी, खरीप हंगामासह सिंचनाची सोय असल्यास कधीही मक्याची लागवड करता येते. इथेनॉल मिश्रणाची २० टक्के पातळी गाठण्यासाठी गहू, तांदूळ, मक्यापासून सुमारे १६५ लाख कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती करावी लागेल. गहू, तांदळाचा अन्नधान्य म्हणून वापर होत असल्यामुळे गहू, तांदळाचा फारसा वापर करता येत नाही. पण मक्याचा खाद्यान्न म्हणून फारसा वापर होत नसल्याने इथेनॉल निर्मितीसाठी जगभरात प्रामुख्याने मक्याचा वापर होतो. देशात अन्नधान्य आधारित इथेनॉल प्रकल्पांची संख्या वेगाने वाढत आहे. या इथेनॉल प्रकल्पांना वर्षाला सुमारे ५० लाख टन मक्याची गरज भासेल, असा प्राथमिक अंदाज आहे. भविष्यात इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढणार आहे. देशात सध्या मक्याचे उत्पादन वर्षाला ३५० ते ३८० लाख टन असून, गरज सरासरी ४०० लाख टनांवर गेली आहे. एकूण मक्यापैकी ४७ टक्के मक्याचा वापर कुक्कुटपालन उद्याोगात कोंबडी खाद्यासाठी केला जातो. १३ टक्के मक्याचा वापर गाय, म्हशींच्या पशुखाद्यासाठी होतो. मक्याची दरवाढ झाल्यामुळे कुक्कुटपालनासह पशुपालन व्यवसाय अडचणीत येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याचा वापर करताना अन्य व्यवसायावरील परिणामाचाही विचार करावा लागणार आहे.
इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का?
२०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. हे साध्य करण्यासाठी अंदाजे १०१६ कोटी लिटर इथेनॉल आवश्यक आहे. अन्य वापरासाठी मिळून एकूण इथेनॉलची गरज १३५० कोटी लिटर आहे. इथेनॉल प्रकल्प स्थापित क्षमतेच्या तुलनेत ८० टक्के इथेनॉल निर्मिती सध्या करीत असल्यामुळे २०२५ पर्यंत सुमारे १७०० कोटी लिटर उत्पादन होऊ शकते. गरजेनुसार नवीन इथेनॉल प्रकल्प उभारले जात असल्यामुळे आणि विद्यामान प्रकल्पांचा विस्तार होत असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात ४०,००० कोटी रु.पेक्षा जास्त गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. इथेनॉल निर्मितीमुळे, पेट्रोल किंवा कच्च्या तेलाच्या आयातीत घट होऊन परदेशी चलनाची बचत झाली आहे. २०२२ – २३ मध्ये सुमारे ५०२ कोटी लिटर इथेनॉलच्या उत्पादनासह भारताने सुमारे २४,३०० कोटी रु.च्या परदेशी चलनाची बचत केली होती.
© The Indian Express (P) Ltd