‘एन्व्हिडिआ’ कंपनी काय करते?

एन्व्हिडिआ ही १९९३ साली जेन्सन ह्युआंग या तैवानी वंशाच्या अमेरिकी अभियंत्यासह त्याच्या दोन मित्रांनी स्थापन केलेली कंपनी सुरुवातीला व्हिडीओ गेमचा दृश्यात्मक प्रभाव वाढवणाऱ्या ग्राफिक्सना बळकटी देणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विकसित करत असे. त्या काळातील अनेक उच्च दर्जाच्या संगणकीय आणि व्हिडीओ गेमना एन्व्हिडिआच्या ग्राफिक्स मेमरी कार्ड किंवा अन्य हार्डवेअरचे पाठबळ असे. कालांतराने या कंपनीने जीपीयू अर्थात ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे संगणकाची दृकचित्र प्रक्रिया क्षमता वाढवण्यात येते. या ‘जीपीयू’चा वापर पुढे व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानासाठी वाढू लागला. त्यापाठोपाठ आलेल्या कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाकरिता ‘प्रोसेसिंग चिप’ तयार करण्याचे कामही एन्व्हिडिआने सुरू केले. यातूनच गेल्या काही वर्षांतच या कंपनीची कैक पटींनी प्रगती झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एआय’च्या प्रसाराचा लाभ कसा झाला?

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामध्ये ‘जीपीयू’चा वापर सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. या ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सच्या माध्यमातून कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचे किचकट अल्गोरिदम जलद सोडवले जातात आणि त्यातून अपेक्षित परिणाम मांडले जातात. विशेषत: बायोमेट्रिकशी संबंधित ‘एआय’ किंवा आरोग्यविषयक निदान करणाऱ्या ‘एआय’मध्ये ‘जीपीयू’ अतिशय महत्त्वाचे ठरतात. आजघडीला या उद्योग क्षेत्रात एन्व्हिडिआचे ‘जीपीयू’ प्रभावी मानले जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या चिपच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>अमेरिकेतील स्थलांतरितांसाठी बायडन सरकारचे नवे धोरण; भारतीयांना कसा होणार फायदा?

कूटचलन ते ‘वर्क फ्रॉम होम’ची चलती

एन्व्हिडिआच्या प्रगतीमध्ये केवळ ‘एआय’चाच वाटा नाही, तर गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान जगताच्या बदललेल्या कार्यपद्धतीनेही या कंपनीला बळकटी दिली आहे. कोविडोत्तर काळात ‘रिमोट वर्किंग’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृती कॉर्पोरेट क्षेत्रात रूढ आणि किंबहुना अपरिहार्यही होऊ लागली आहे. कर्मचाऱ्यांना अशी सुविधा देण्यामागे कंपनीचा आस्थापना खर्च कमी करण्याकडे कल असतो. मात्र यासाठी संगणकीय क्षमता वाढवणे क्रमप्राप्त असते. त्यासाठी लागणाऱ्या शक्तिशाली चिप बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये एन्व्हिडिआ आघाडीवर आहे. याचाही या कंपनीचा भरभराटीला फायदा झाला आहे. बिटकॉइनसारख्या कूटचलनाचे व्यवहार वाढत असून अधिकाधिक कंपन्या आपले कूटचलन बाजारात आणत आहेत. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या अखंडित आणि अतिजलद व्यवहारांसाठी लागणाऱ्या चिपदेखील एन्व्हिडिआ पुरवत असल्याने या कंपनीचा प्रभाव वाढत चालला आहे.

वर्षभरात उत्पन्नात किती भर पडली?

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या प्रगतीने गेल्या दोन वर्षांत एन्व्हिडिआच्या भरारीला बळ दिले आहे. जवळपास वर्षभरापूर्वीच एक लाख कोटी डॉलरचे बाजारमूल्य असलेली ही कंपनी जून २०२४ मध्ये साडेतीन लाख कोटी डॉलरचे बाजारमूल्य गाठते, यातच सारे आले. ऑक्टोबर २०२२ मध्ये कारकीर्दीतील तळाच्या स्तरावर असलेले एन्व्हिडिआचे समभाग अवघ्या दीड वर्षांत ११०० टक्क्यांनी उसळले आहेत. चालू वर्षांतच यात १७० टक्क्यांची भर पडली आहे. चालू तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न तिपटीने वाढून २६ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे, तर निव्वळ कमाईत सातपट वाढ होऊन ती १४ अब्ज डॉलरवर गेली आहे.

हेही वाचा >>>अमेरिकेतील स्थलांतरितांसाठी बायडन सरकारचे नवे धोरण; भारतीयांना कसा होणार फायदा?

९६ दिवसांत एक लाख कोटी डॉलर

एन्व्हिडिआच्या जबरदस्त उसळीचे आणखी एक उदाहरण म्हणजे, अवघ्या ९६ दिवसांत या कंपनीचे बाजारमूल्य एक लाख कोटींनी वाढले. इतकीच रक्कम गाठताना मायक्रोसॉफ्ट कंपनीला ९४५ दिवस लागले होते, तर अ‍ॅपलला १०४४ दिवस मोजावे लागले होते. यावरून एन्व्हिडिआच्या अचाट कामगिरीचा अंदाज येतो. विशेष म्हणजे, १९२५ पासून आतापर्यंत केवळ ११ अमेरिकी कंपन्यांना सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या यादीत अव्वल स्थान गाठता आले आहे.

‘एआय’च्या लाटेवर स्वार.. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान वापरकर्त्यांसाठी भविष्यात किती उपयुक्त ठरणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्याच भविष्यातील उद्योग जगताचे नेतृत्व करतील, हेही आता उघड होत आहे. एन्व्हिडिआच्याच बाबतीत बोलायचे झाले तर पुढील दोन वर्षांत ही कंपनी १६० अब्ज डॉलरचे उत्पन्न देणारी कंपनी ठरेल, असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. पण आता या कंपनीने स्वयंचलित वाहतूक तंत्रज्ञाननिर्मितीत पाय रोवण्यास सुरुवात केली असून त्या शक्तिशाली चिपनिशी रस्त्यांवर वाहने धावतील. त्याच वेळी एन्व्हिडिआसारख्या ‘एआय’ चिप निर्मात्या कंपन्यांच्या उत्पन्नाचे आकडे आकाशाला गवसणी घालताना दिसतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained what is the reason for the huge boom of nvidia print exp 0624 amy