गेल्या सहा महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये पोलिसांनी नक्षलवादी चळवळीचे केंद्र बिंदू असलेल्या ‘अबुझमाड’ परिसराला ताब्यात घेण्यासाठी ‘माड बचाव’ अभियान सुरू केले आहे. यादरम्यान झालेल्या चकमकीत १३५ हून अधिक नक्षलवादी ठार झालेत. काहींनी आत्मसमर्पण केले तर काहींना अटक करण्यात आली. यामुळे नक्षलवादी चळवळील मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगडमध्ये नेमके काय सुरू आहे. याबद्दल जाणून घेऊया. 

काय आहे ‘माड बचाव’ अभियान?

‘अबुझमाड’ हा नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमध्ये येणारा डोंगराळ, जंगली भाग आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अलिप्त आणि अतिदुर्गम असून नक्षलवा‌दी  कारवायांचा केंद्रबिंदू मानला जातो. घनदाट जंगल, उंच टेकड्या आणि किचकट भौगोलिक रचना यामुळे हा परिसर नक्षलवाद्यांसाठी नंदवन आहे. या भागात सर्वाधिक आदिवासी समूह वास्तव्यास असून अजूनही या भागातील काही गावांची सरकार दरबारी नोंद नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी या परिसरावर कब्जा केला आहे. येथून ते चळवळ चालवतात. हा परिसर नक्षलमुक्त करण्यासाठी छत्तीसगड पोलिसांनी ‘माड बचाव’ अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारच्या विविध सुरक्षा दलातील जवान मागील सहा महिन्यांपासून संयुक्तपणे अबुझमाड भागात आक्रमक नक्षलविरोधी अभियान राबवत आहेत. यामध्ये आत्तापर्यंत १३५ नक्षलवादी ठार झाले आहेत. यात मोठ्या नक्षलवादी नेत्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पोलीस अबुझमाडवर ताबा मिळवतील अशी चर्चा आहे.

हेही वाचा >>>‘या’ आशियाई देशातही समलैंगिक विवाहास मान्यता; आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी दिली समलैंगिक विवाहाला मान्यता?

सरकारची भूमिका काय? 

सत्ता परिवर्तनानंतर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारच्यासोबत केंद्र सरकारनेदेखील कंबर कसल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगडच्या सर्वाधिक नक्षल प्रभावित बस्तर विभागात केंद्र सरकारने तैनात केलेल्या विविध सुरक्षा दलात मोठ्या संख्येने वाढ करण्यात आली आहे. स्थानिक आदिवासी युवकांना पोलीस दलात सामील करून त्यांच्या संपर्काचा वपार केला जात आहे. अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात पोलीस मदत केंद्राची संख्या वाढविण्यात येत आहे. आधुनिक शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आलेले आहे. यामागे केंद्र सरकारने घेतलेली कडक भूमिका कारणीभूत आहे. सोबत ‘सोशल पोलिसिंग’च्या माध्यमातून जनतेमध्ये पोलिसांबद्दल विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न होतो आहे. यासाठी राज्यासह केंद्राने अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. 

काही चकमकींवर प्रश्न का उपस्थित झाले?

पोलिसांच्या आक्रमक अभियानातदरम्यान मागील सहा महिन्यात झालेल्या चकमकीत छत्तीसगडमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवादी मारल्या गेले. परंतु यातील काही चकमकी वादात सापडल्या आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पत्रक काढून चकमकीवर प्रश्न उपस्थित केले होते. मे महिन्यात नारायणपूर जिल्ह्यात येणाऱ्या काकूर, टेकामेटा आणि बिजापूरच्या जंगलात झालेल्या चकमकीत १२ सामान्य नागरिकांना मारल्याचा आरोप करण्यात आला होता. या गावातील नागरिकांनीही याविरोधात आवाज उठवला होता. पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी छत्तीसगडमध्ये सुरू असलेले नक्षलविरोधी अभियान वादात सापडले. दरम्यान, या भागात चकमकी सुरूच असून नक्षलवाद्यांसह सामान्य नागरिकदेखील दहशतीत असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा >>>विश्लेषण: संत्र्याच्या बागांवरील संकट केव्हा दूर होणार?

नक्षलवादी चळवळीला हादरा बसलाय का? 

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याची सीमा अबुझमाडला लागून आहे. या परिसराला नक्षल्यांचा दांडकारण्य झोन म्हणूनदेखील ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही भागात नक्षलवाद्यांची प्रचंड दहशत आहे. परिसरात हिंसक कारवाया सुरूच असतात. परंतु यंदा गडचिरोलीत शांततेत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवरून नक्षल चळवळ कमकुवत झाल्याचे दिसून येते. मधल्या काळात मोठे नेते ठार झाल्याने अनेकांनी आत्मसमर्पण करून मुख्य मार्ग स्वीकारला. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये गेल्या सहा महिन्यात १३५ नक्षलवादी ठार झाले. यात बहुतांश कमांडर, विभागीय समिती सदस्य असलेल्या नेत्यांचा सहभाग होता. दरम्यान  ५०३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४३७ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. यावरून ही रक्तारंजित चळवळ लवकरच संपुष्टात येईल असे सांगितले जात आहे. 

नक्षलमुक्त अबुझमाड शक्य आहे काय?

दांडकारण्य झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडीशा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यातील सीमाभाग नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे कायम दहशतीत असतो. परंतु पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे ही चळवळ महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यातील बस्तरमधील काही जिल्ह्यात मर्यादित झाल्याचे चित्र आहे. मात्र, याही भागात पोलिसांनी अतिशय आक्रमकपणे सुरू केलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल्यांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे काही महत्त्वाचे नेते ठार झाले. तर उर्वरित अबुझमाडमध्ये लपून बसले आहे. या ठिकाणी जवळपास हजारावर सशस्त्र नक्षलवादी लपून असल्याचा अंदाज पोलीस सांगतात. पोलीस नक्षलवादी संघर्षात सामान्य नागरिक भरडला गेला. त्यामुळे गाव गावकऱ्यांमधून नक्षल्यांना मिळणारे समर्थन कमी झाले आहे. दुसरीकडे माड भागात पोलिसांनी थेट कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे काही महिने हीच परिस्थिती राहिल्यास लवकरच नक्षलमुक्त अबुझमाडचे स्वप्न पूर्ण होईल, असे या भागातील जाणकार सांगतात.