येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात तयारी केली जातेय. भाजपाकडून या सोहळ्याचा राजकारणासाठी वापर केला जात आहे, असा आरोप अनेक जण करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यानंतर अयोध्येतील राम मंदिरासोबतच नाशिकचे काळाराम मंदिर चर्चेत आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिराचे महत्त्व काय? या मंदिराचा इतिहास काय? हे जाणून घेऊ या…
नरेंद्र मोदींनी दिली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पंचवटी परिसरातील काळाराम मंदिराला भेट दिली. याआधी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनीदेखील २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेऊ, असे जाहीर केलेले आहे.
काळाराम मंदिराला महत्त्व का?
नाशिकचे काळाराम मंदिर अनेक कारणांमुळे खास आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. त्यालाच ‘काळाराम मंदिराचा सत्याग्रह’ म्हणून ओळखले जाते. यासह ज्या परिसरात हे मंदिर उभे आहे, त्या पंचवटी परिसराचे रामायणात फार महत्त्व आहे. त्यामुळेदेखील नाशिकच्या या काळाराम मंदिराला विशेष महत्त्व आहे.
पंचवटी दंडकारण्याचा एक भाग
रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटना याच पंचवटी परिसरात घडलेल्या आहेत. राम, सीता आणि लक्ष्मण यांनी आपल्या १४ वर्षांच्या वनवासातील सुरुवातीची काही वर्षे दंडकारण्य या भागात घालवली. पंचवटी हा परिसर याच दंडकारण्यातील एक भाग समजला जातो.
पंचवटी भागातूनच सीतेचे अपहरण
पंचवटी या परिसरात वडाची पाच घनटाद झाडे होती. याच झाडांमुळे या परिसराचे नाव पंचवटी पडले असे म्हटले जाते. महाकाव्यानुसार या पाच वृक्षांमुळे हा परिसर शुभ समजून राम, सीता आणि लक्ष्मण यांनी आपली झोपडी या परिसरात उभारली होती. रावणाने सीतेचे अपहरण याच पंचवटी भागातून केल्याचे म्हटले जाते. त्यानंतरच रामाने सीतेच्या शोधात दक्षिण भारताकडे प्रयाण केले होते. त्यानंतर रामायण घडले.
आंबेडकरांच्या सत्याग्रहामुळेही खास ओळख
फक्त रामायणातील संदर्भांमुळेच काळाराम मंदिर आणि पंचवटी परिसर प्रसिद्ध आहे असे नाही. अस्पृश्यांना समान अधिकार मिळावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता. त्यामुळेदेखील नाशिकमधील या मंदिराला विशेष महत्त्व आहे. आंबेडकरांनी हा सत्याग्रह २ मार्च १९३० रोजी केला होता. तेव्हा आंबेडकरांनी काळाराम मंदिरासमोर मोठे आंदोलन केले होते. त्यासाठी दलित समाजातील आंदोलक नाशिकमध्ये मोठ्या संख्येने जमले होते. लोकांनी काळाराम मंदिर परिसरात सत्याग्रह केला होता. या आंदोलनादरम्यान पाच दिवस आंदोलकांनी घोषणा, गाणे गात मंदिरात प्रवेशासाठी समान अधिकार मिळावा, अशी मागणी केली होती.
सत्याग्रहींवर दगडफेक
या सत्याग्रहाला तेव्हा बराच विरोध झाला होता. आंदोलकांवर दगडफेक झाली होती. दगडफेक करून दलितांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी आंबेडकरांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या चरित्रात्मक पुस्तकात या प्रसंगाचे सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह १९३५ सालापर्यंत चालूच होता.
आंबेडकर, साने गुरुजींचा सत्याग्रह
अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरील पाणी वापरण्याचा समान अधिकार मिळावा, म्हणूनही आंबेडकरांनी १९२७ साली सत्याग्रह केला होता. त्याला चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून ओळखले जाते. साने गुरुजी यांनीदेखील अस्पृश्यांच्या अधिकारांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापुढे सत्याग्रह केला होता.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी ६ जानेवारी रोजी मी काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे, असे जाहीर केले होते. “आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेणार आहोत. याच मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजींनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. प्रभू राम हे सर्वांचेच आहेत, अशी त्यांची भूमिका होती,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
राम, सीता, लक्ष्मणाची काळ्या रंगाची मूर्ती
दरम्यान, या मंदिराची रचना आणि त्यातील मूर्ती विशेष आहेत. या मंदिरातील राममूर्ती काळ्या रंगाची आहे. याच मूर्तीच्या रंगामुळे या मंदिराचे काळाराम मंदिर असे नाव पडलेले आहे, तर मुख्य प्रवेशद्वारावर हनुमानाची मूर्ती आहे.
मूर्ती सापडल्या त्या भागाला रामकूंड असे नाव
दरवर्षी या मंदिराला हजारो भाविक भेट देतात. हे मंदिर १७९२ साली उभारण्यात आले होते. काळाराम मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सरदार ओढेकर यांनी गोदावरीच्या पात्रात रामाची काळ्या रंगाची मूर्ती असल्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर या नदीपात्रातून या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या होत्या आणि या भागात मंदिर उभारण्यात आले होते. ज्या ठिकाणी मूर्ती सापडल्या होत्या, त्या भागाला रामकूंड असे नाव देण्यात आलेले आहे.
मंदिराची विशेषता काय?
या काळाराम मंदिराला एकूण १४ पायऱ्या आहेत. रामाने भोगलेल्या १४ वर्षांच्या वनवासाचे प्रतीक म्हणून या पायऱ्यांकडे पाहिले जाते. या मंदिराला एकूण ८४ खांब आहेत. पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेण्यासाठी अगोदर ८४ लाख प्रजातींमध्ये जन्म घ्यावा लागेल, असे यातून सांगण्यात आलेले आहे.