सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘काली’ हे भारताचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (ईएमपी) प्रकारातील अस्त्र आहे. ‘किलो अँपियर लिनिअर इंजेक्टर’ या शब्दसमूहाचे ‘काली’ हे लघुरूप आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याकडून सध्या त्याचा विकास केला जात आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. आर. चिदंबरम यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला १९८५ साली सुरुवात झाली. त्यावर प्रत्यक्ष काम १९८९ पासून सुरू झाले. सुरुवातीला हा एक औद्योगिक प्रकल्प होता. पुढे त्याचा संरक्षण क्षेत्रातील वापर लक्षात घेऊन विकास केला गेला आणि त्यात ‘डीआरडीओ’ला सामावून घेण्यात आले. पूर्णपणे विकसित झाल्यानंतर त्याने शत्रूची क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन, कृत्रिम उपग्रह आदी निकामी करून पाडता येऊ शकतील.

काली हे लेझर किरण अस्त्र असल्याचे सामान्यत: मानले जाते. मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यपद्धती वेगळी आहे. लेझर किरणांनी लक्ष्याला जसे छिद्र पाडले जाते तसे कालीच्या वापराने पडत नाही. काली हे मुळात पार्टिकल अ‍ॅक्सिलरेटर प्रकारातील उपकरण आहे. त्याने इलेक्ट्रॉन कणांना गती दिली जाते आणि इलेक्ट्रॉनची किरणशलाका तयार करून ती लक्ष्यावर सोडता येते. तिला रिलेटिव्हिस्टिक इलेक्ट्रॉन बीम (आरईबी) म्हणतात.

कालीतील उपकरणे इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेचे रूपांतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये करतात आणि ती हाय पॉवर मायक्रोवेव्हज (एचपीएम) आणि फ्लॅश एक्स-रे (एफएक्सआर) यांच्या स्वरूपात वापरता येते. त्याने शत्रूच्या क्षेपणास्त्रे, विमाने, कृत्रिम उपग्रह आदींवरील इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होतात आणि परिणामी लक्ष्य जमिनीवर किंवा समुद्रात पाडता येते. त्याला सॉफ्ट-किल असे म्हणतात. त्यामुळे भविष्यात कालीचा हाय पॉवर मायक्रोवेव्ह गन म्हणून वापर करता येईल.

सुरुवातीच्या अ‍ॅक्सिलरेटरची शक्ती ०.४ गिगाव्ॉटच्या आसपास होती. ती पुढील आवृत्तींमध्ये वाढवण्यात आली. सध्या काली ८०, काली २००, काली १०००, काली ५००० आणि काली १०००० अशी मालिका विकसित केली जात असून त्यांचे वर्णन सिंगल शॉट पल्स गिगाव्ॉट इलेक्ट्रॉन अ‍ॅक्सिलरेटर्स असे वर्णन केले जाते.

कालीला रिचार्ज करण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे सध्या तिचा वापर एकदाच करता येतो. तिचा आकारही खूप मोठा आहे. शस्त्र म्हणून वापरण्यासाठी कालीचा आकार आटोपशीर करणे आणि तिचा रिचार्जसाठीचा वेळ कमी करणे गरजेचे आहे. त्याला अद्याप बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर काली प्रणाली हवाईदलाच्या आयएल-७६ विमानांवर तैनात करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, कालीच्या तंत्रज्ञानाचा अन्य कामांसाठी वापर होऊ लागला आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या क्ष-किरणांचा वापर बॅलिस्टिक संशोधनात अतिवेगवान छायाचित्रणासाठी केला जात आहे.

कालीतून बाहेर पडणाऱ्या मायक्रोवेव्हजचा वापर करून तेजस या स्वदेशी लढाऊ विमानावरील इलेक्ट्रॉनिक यंत्रणांची शत्रूच्या ईएमपी हल्ल्यांना बळी पडण्याची शक्यता तपासून पाहण्यात आली. तसेच त्यातून तेजस विमान आणि भारताच्या क्षेपणास्त्रांवरील इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा ईएमपी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डचा विकास करण्यात आला.

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about electromagnetic pulse weapon of india