सचिन दिवाण -sachin.diwan@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची विध्वंसक क्षमता फारच जास्त होती. ते प्रत्यक्ष युद्धात वापरले जाण्याची शक्यताही कमी होती. तसेच अणुबॉम्बच्या हल्ल्यापासून माणसे आणि वाहने, इमारती आदी मालमत्ता वाचवण्याचे अनेक प्रयत्न सुरू होते. त्यासाठी जमिनीखाली अनेक फूट खोलवर जाड काँक्रीटचे आवरण असलेले बंकर उभारले जाऊ लागले. रणगाडे आणि लष्करी वाहने अणुस्फोटातून वाचवण्यासाठी खास सोय केली जाऊ लागली. अणुस्फोटाच्या अगदी केंद्रस्थानी असलेली माणसे, वाहने किंवा मालमत्ता वाचू शकत नव्हती. पण काही अंतरावरील रणगाडय़ांत सैनिक सुरक्षित राहू शकत होते. त्यांना मारणे हे पुढील उद्दिष्ट होते. त्यातून न्यूट्रॉन बॉम्बचा जन्म झाला.

अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बपेक्षा न्यूट्रॉन बॉम्बची संकल्पना थोडी वेगळी आहे. अणुबॉम्बमध्ये स्फोटाची शक्ती वाढवण्यावर भर आहे. प्रचंड मोठा स्फोट आणि त्यानंतर येणारे उष्ण वाऱ्यांचे वादळ आणि कंपने (शॉकव्हेव्ज) यातून बराच संहार होतो. तर किरणोत्सारातून होणारा संहार त्यापेक्षा कमी असतो. न्यूट्रॉन बॉम्बमध्ये स्फोटाची तीव्रता कमी करून किरणोत्साराचा परिणाम वाढवण्यात आलेला असतो. म्हणजे न्यूट्रॉन बॉम्बने स्फोटाची आग आणि कंपने अजिबात निर्माण होत नाहीत असे नाही. मात्र तो परिणाम अणुबॉम्बच्या तुलनेत कमी असतो. त्यापेक्षा न्यूट्रॉनचा उत्सर्ग आणि गॅमा किरणांचा मारा अधिक होईल याकडे लक्ष पुरवलेले असते. हे वेगवान आणि शक्तिशाली न्यूट्रॉन रणगाडय़ांचे धातूचे अनेक इंच जाडजूड चिलखत आणि जमिनीखालील बंकरचे अनेक फूट जाडीचे काँक्रीटचे आवरण भेदून आतील माणसांच्या शरीरात घुसतात. मानवी शरीरात न्यूट्रॉनची आणि आण्विक प्रारणांची अतिरिक्त मात्रा गेल्याने मृत्यू येतो. त्यामुळे त्याला एन्हान्स्ड रेडिएशन वॉरहेड असे म्हणतात.

न्यूट्रॉन बॉम्बच्या स्फोटात केवळ माणसे मारली जातील आणि मालमत्ता सुरक्षा राहील असा गैरसमज आहे. तसेच अणुबॉम्बच्या अतिसंहारकतेमुळे त्यांचा वापर करण्यास सेनादले कचरतील. पण न्यूट्रॉन बॉम्बच्या कमी संहारकतेमुळे ते तुलनेने अधिक मोकळेपणाने वापरले जातील अशी भीती अनेकांना वाटत होती. त्यापोटी न्यूट्रॉन बॉम्बला बराच विरोध झाला. ही अण्वस्त्रे लहान आकारात तयार करून क्षेपणास्त्रे, तोफा आणि विमानांवरून डागता येतील अशी योजना होती. तसेच न्यूट्रॉन बॉम्बचा वापर शत्रूच्या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांविरुद्धही करता येईल. शत्रूच्या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राच्या जवळ हवेत जर क्षेपणास्त्रावरून नेऊन न्यूट्रॉन बॉम्बचा स्फोट केला तर त्याच्या किरणोत्साराने शत्रूच्या अणुबॉम्बचा प्रभाव ओसरेल असा कयास होता.

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neutron bomb based on atomic radiations