पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी अभिषेक नायर आणि रायन टेन डोस्काटे यांचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या साहाय्यकांमध्ये समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा माजी अष्टपैलू नायर आणि नेदरलँड्सचा माजी अष्टपैलू टेन डोस्काटे यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघात गंभीरसह काम केले आहे. गंभीर या संघाचा प्रेरक (मेंटॉर) होता, तर नायर व डोस्काटे यांनी साहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. त्यामुळे गंभीरनेच या दोघांचे नाव ‘बीसीसीआय’ला सुचवल्याची माहिती आहे.

मुंबईचा माजी कर्णधार नायरने खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर वैयक्तिक प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून भारतीय क्रिकेट वर्तुळात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिनेश कार्तिक आणि रिंकू सिंह यांच्या यशात नायरचे मोठे योगदान आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्सच्या अकादमीतही त्याने युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे त्याला आपल्या साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी गंभीर उत्सुक आहे.

हेही वाचा >>>Team India : गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये मॉर्ने मॉर्केलसह ‘या’ चार माजी दिग्गजांची लागू शकते वर्णी, जाणून घ्या कोण आहेत?

तसेच टेन डोस्काटेचेही गंभीरने बरेच कौतुक केले आहे. गंभीर पूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार होता आणि त्यावेळी डोस्काटेचाही संघात समावेश होता. डोस्काटेला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही, तरी तो कधीही तक्रार करायचा नाही किंवा तोंड पाडून बसायचा नाही. तो कायम अन्य खेळाडूंना प्रोत्साहन देत राहायचा अशा शब्दांत गंभीरने डोस्काटेचे कौतुक केले होते. त्यामुळे आता त्याने भारतीय संघात आपल्याबरोबर काम करावे अशी गंभीरची इच्छा आहे. डोस्काटे सध्या अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये (एमएलसी) एलए नाइट रायडर्स संघाला मार्गदर्शन करत आहे.

भारतीय संघाच्या नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते. या पदासाठी भारताचे माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार आणि लक्ष्मीपती बालाजी, तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल यांची नावे गंभीरने ‘बीसीसीआय’ला सुचवली होती. यापैकी मॉर्केलचे पारडे सध्या जड मानले जात आहे. तसे झाल्यास भारतीय संघाला १० वर्षांनंतर परदेशी गोलंदाजी प्रशिक्षक मिळेल. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात मॉर्केलने पाकिस्तान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी दिलीपच?

भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी टी. दिलीप कायम राहण्याची शक्यता आहे. राहुल द्रविडच्या कार्यकाळात दिलीप यांनीच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अधिक सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा त्यांनाच ही जबाबदारी दिली जाऊ शकेल. भारतीय संघ २२ जुलैला मुंबईहून कोलंबोसाठी रवाना होणार असून नायर आणि दिलीप संघाबरोबरच जाण्याची शक्यता आहे. डोस्काटे भारतीय संघाशी कधी जोडला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek nair ten doscate assistant coach for sri lanka tour sport news amy