भारतीय महिला क्रिकेट संघातील धमाकेदार फलंदाज हरमनप्रीत कौरला नुकतेच केंद्र सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा बहुमान स्वीकारताना तिच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहू शकला नाही. आई-वडील या आनंदात सहभागी न झाल्याची खंत तिने कार्यक्रमानंतर व्यक्त केली. मोगामध्ये कर्फ्यू लागू असल्यामुळे आई-वडील या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत, असे तिने सांगितले.
‘या कार्यक्रमाला दिल्लीमध्ये येण्यासाठी आई-वडील खूपच उत्सुक होते. त्यांनी या कार्यक्रमासाठी नवे कपडे देखील खरेदी केले. पण धोका पत्करुन त्यांनी इकडे यावे, असे मला वाटत नव्हते. कुटुंबिय उपस्थित नसल्याने खूप दुःख झाले, असे हरमनप्रीत यावेळी म्हणाली. अर्जुन पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात हरमनप्रीतने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेहमी जीन्स आणि टी शर्ट घालून दिसणारी हरमनप्रीत या कार्यक्रमात साडी नेसून आली होती. तिची आई या कार्यक्रमाला आली नसल्यामुळे तिची पूर्ण तयारी बास्केटबॉलपटू प्रशांती सिंहच्या आईने केली.
कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर हरमनप्रीतचा मरुन रंगाच्या साडीतील फोटोची चांगलीच चर्चा सुरु आहे. तिच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या मित्रमंडळींनी तिचा हो फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हरमनप्रीत तयार होताना दिसत आहे. प्रशांतीची आई तिला तयार करताना फोटोमध्ये दिसून येते. भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज हरमनप्रीतने महिला विश्वचषकातील उपांत्य सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीने क्रिकेट जगतात एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. डावाला सुरुवात न करता मधल्या फळीत येऊन सर्वाधिक धावा करण्याचा करिष्मा हरमनप्रीतने विश्वचषकात केला. तिच्या दमदार कामगिरीची केंद्र सरकारने दाद घेतली. तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.