माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राकडून कौतुक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करण्याची क्षमता उमेश यादवकडे आहे व तो अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळत असतो, असे ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनी सांगितले.

‘‘उमेशच्या गोलंदाजीत प्रत्येक सामन्यानंतर प्रगती होत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात कसे जबाबदारीने खेळावयाचे असते, हे तो बरोबर खेळून त्यानुसार गोलंदाजी करीत असतो. तंदुरुस्तीपेक्षाही तुम्ही किती वेळ सलग गोलंदाजी करू शकता, हे जास्त महत्त्वाचे असते. वयोपरत्वे तंदुरुस्तीच्या समस्या निर्माण होत असतात. मात्र त्यामधून कसे तंदुरुस्त होता येईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येक द्रुतगती गोलंदाजास काही काळ विश्रांती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जर ही विश्रांती घेतली नाही तर करिअरला घातक अशा दुखापतीच्या समस्यांनी खेळाडूंना ग्रासले जाते,’’ असे मॅकग्राने सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘आमच्या देशाबरोबरच अन्य देशांमधील वेगवान गोलंदाजांनाही दुखापतीचे प्रसंग स्वीकारावे लागतात. त्यामधून कसे लवकर तंदुरुस्त होता येईल, याचा विचार केला जात असतो. दुखापती कशा टाळता येईल, या दृष्टीने सराव शिबिरात योग्य ते व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. किती वेगाने चेंडू टाकता, यापेक्षाही अचूक टप्पा व दिशा ओळखून गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.’’

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे रणजी, २३ व १९ वर्षांखालील वेगवान गोलंदाजांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून, त्याला मॅकग्रा यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मानधनाचा प्रश्न लवकर मिटावा!

‘‘ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे आदर्श खेळाडू म्हणून सारे जग पाहात असते. मात्र मानधनाच्या प्रश्नावरून आमचे खेळाडू व क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात जे वादंग सुरू आहे, ते लवकरात लवकर मिटले पाहिजे. ही समस्या झटपट दूर झाली तर आपोआपच खेळाडू सरावावर लक्ष केंद्रित करू शकतील. आमचा संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे तसेच भारताबरोबर एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. त्यादृष्टीने क्रिकेट मंडळाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,’’ असे त्याने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glenn mcgrath praises experienced umesh yadav