आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी ४ बाय १०० मीटर पुरुषांच्या फ्रीस्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने ३:२३.७२ सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणाऱ्या इराणच्या संघाने ३:२८.४६ सेकंद अशी वेळ नोंदवली, तर तिसऱ्या स्थानावरील उझबेकिस्तानच्या संघाने ३:३०.५९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.

भारताच्या आव्हानाला सुरुवात श्रीहरीने करताना ५०.६८ सेकंदांसह पहिला टप्पा पूर्ण केला. इराणचा सिना घोलमपौरला ५१.४२ सेकंद लागले. मग आनंदने आघाडी कायम राखताना ५१.२८ सेकंदांत अंतर पूर्ण केले, तर तिसऱ्या टप्प्यात साजनने ५१.३७ सेकंद अशी वेळ नोंदवली. अखेरच्या टप्प्यात वीरधवलने ५०.३९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.

महिलांच्या ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रुजूता खाडे (५९.८३ सेकंद), दिव्या सतिजा (१:०१.६१ सेकंद), शिवानी कटारिया (५९.५७ सेकंद) आणि माना पटेल (५९.७५ सेकंद) यांचा भारतीय संघात समावेश होता.

गट-दोन मुलांच्यांमध्येसुद्धा भारतीय संघाला ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात रौप्यपदक मिळले. वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लष्कर आणि शोआन गांगुली यांचा समावेश असलेल्या संघाने ३:४१.४९ सेकंद अशी वेळ नोंदवली.

कुशाग्रला दुहेरी सुवर्ण

भारताच्या कुशाग्र रावतने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या २०० मीटर प्रकारात रावतने १:५२.३० सेकंदांनिशी सुवर्णपदक जिंकले, तर आनंद अनिलकुमारने १:५२.१९ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले. सिरियाच्या अब्बास ओमरला कांस्यपदक मिळाले. मग ८०० मीटर स्पर्धेत त्याने ८:१०.०५ सेकंदांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold in the relay to india asian age swimming competition abn