ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे मालिका गमावलेला भारतीय संघ बुधवारी उरलेला सन्मान वाचवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. गोलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे भारताला धावांचे इमले रचूनही पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला उर्वरित दोन सामन्यांत लाजिरवाणा पराभव टाळण्यासाठी खटपट करावी लागणार आहे, तर ऑस्ट्रेलिया मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतात होऊ घातलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात होते. त्यामुळे मालिकेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर भारताची परीक्षाच होती. त्यात फलंदाजांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले असले तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाडय़ांवर भारताने सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळेच तीनशे धावा उभ्या करूनही भारताला विजय मिळवता आलेला नाही. कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर भारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यापूर्वी २००७-०८च्या तिरंगी मालिकेत भारताला या मैदानावर श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या मालिकेतील संघात महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांचा समावेश होता. हे तिघे वगळता बुधवारच्या लढतीतील संपूर्ण संघ नवा आहे.
भारताच्या फलंदाजीचा विचार केल्यास रोहित शर्मा़, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात आहेत. चौथ्या लढतीतही त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र, गोलंदाजी हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व बरिंदर सरण यांना प्रभाव पाडता आलेला नाही. फिरकीपटू आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांचा माराही ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर बोथट ठरला आहे. त्यामुळे यांना उर्वरित दोन सामन्यांत चांगली कामगिरी करावीच लागेल.
दुसरीकडे, मालिका विजय निश्चित केल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघातील वातावरण आरामदायी आहे. त्यात डेव्हिड वॉर्नर परल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे. ग्लेन मॅक्सवेलनेही तिसऱ्या सामन्यात संयमी खेळी साकारत फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. गोलंदाजीतही बाजू वरचढ असल्यामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेत निभ्रेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघ
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, आरोन फिन्च, जॉर्ज बेली, जॉन हेस्टिंग्ज, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड, शॉन मार्श, केन रिचर्डसन, मिचेल मार्श.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, गुरकीरत मान, रिशी धवन, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर सरण.

क्रिकेटपटू म्हणून प्रगती करण्याच्या दिशेने मी वाटचाल करत आहे. प्रतिस्पर्धी नेहमी तुम्हाला बाद करण्याच्या प्रयत्नात असतात, तुमच्यावर मात करण्यासाठी सज्ज असतात, त्यामुळे त्यांच्या पुढे राहण्याची गरज आहे. प्रत्येक दिवशी मी नवीन काही तरी शिकत आहे.
– विराट कोहली

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सुरुवातीला बळी टिपणे महत्त्वाचे असते. माझ्या मते एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिली दहा षटके कसोटीप्रमाणे खेळली जात आहेत. त्यानंतर मधल्या षटकांमध्ये धावगती वाढवली जाते आणि अंतिम षटकांत धावांचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे गोलंदाजांसाठी हे आव्हानात्मक आहे. त्यात खेळपट्टी पाटा असल्यावर गोलंदाजांवरील दबाव वाढतो.
-डेव्हिड वॉर्नर

सामन्याची वेळ : सकाळी ८.५० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs australia fourth one day at canberra