IND vs ENG Test Series: इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने लावली विक्रमांची रांग; भारतासाठी ठरला खलनायक

२०२२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॉनी बेअरस्टो पहिल्या स्थानावर आहे.

Jonny Bairstow
फोटो सौजन्य – ट्वीटर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. एजबस्टन येथे झालेल्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. भारताने इंग्लंडला विजयासाठी एकूण ३७८ धावांचे लक्ष्य दिले होते. हे इंग्लंडला शेवटच्या डावात आतापर्यंत मिळालेले सर्वात मोठे लक्ष्य होते. त्यामुळे इंग्लंडचा विजयी प्रवास खडतर मानला जात होता. मात्र, जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने २५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून भारताला मालिका विजयापासून रोखले. जॉनी बेअरस्टो तर या सामन्यामध्ये भारतासाठी खलनायकच ठरला.

इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोने एजबस्टन कसोटीच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात शतक (११४) झळकावून इतिहास रचला. या कसोटीतील बेअरस्टोचे हे दुसरे शतक होते. पहिल्या डावातही त्याने बॅटने १०६ धावा केल्या होत्या. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. दुसऱ्या डावात ठोकलेले शतक हे बेअरस्टोच्या कसोटी कारकिर्दीतील १२वे आणि २०२२ मधील सहावे शतक ठरले. एवढेच नाही तर गेल्या तीन कसोटी सामन्यांतील शेवटच्या पाच डावांमधील हे त्याचे चौथे शतक आहे.

हेही वाचा – IND vs ENG Test Series : बेअरस्टो आणि रूटने हिसकावून नेला भारताचा विजय; मालिका सुटली बरोबरीत

यापूर्वी, त्याने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धडाकेबाज शतकी खेळी केल्या होत्या. किवी संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात आणि तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतके झळकावले होती. याशिवाय, एजबस्टन कसोटीतील चौथ्या दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार डावांचा टप्पा ओलांडला होता. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंड ११वा खेळाडू ठरला आहे.

२०२२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॉनी बेअरस्टो पहिल्या स्थानावर आहे. यावर्षी त्याने आठ कसोटी सामन्यांतील १६ डावांमध्ये ९८० धावा फटकावल्या आहेत. ज्यात सहा शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng jonny bairstow created several records by scoring 6th test hundred in 2022 vkk

Next Story
IND vs ENG Test Series : बेअरस्टो आणि रूटने हिसकावून नेला भारताचा विजय; मालिका सुटली बरोबरीत
फोटो गॅलरी