पॅरिस : आयुष्यातील अनेक खडतर आव्हानांना झुंज देत खेळाच्या मैदानात ताठ मानेने उभ्या राहणाऱ्या अपंग खेळाडूंना आज, बुधवारपासून पॅरालिम्पिकच्या व्यासपीठावर झळकण्याची संधी मिळणार आहे. यंदा पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय पथकात सर्वाधिक ८४ खेळाडूंचा समावेश असून त्यांनी विक्रमी कामगिरीचे उद्दिष्ट बाळगले आहे.

तीन वर्षांपूर्वी टोक्योत २४व्या स्थानावर राहिलेल्या भारताने पाच सुवर्णपदकांसह १९ पदके जिंकली होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. आता पॅरिसमध्ये तरुणाई आणि अनुभवाचे उत्तम मिश्रण असणारा भारतीय संघ विविध स्पर्धा प्रकारांत अतुलनीय कामगिरी करून पंचवीसहून अधिक पदके जिंकण्याचे ध्येय बाळगून आहे.

हेही वाचा >>> Jay Shah ICC Chairman: जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जागतिक क्रिकेटमध्ये आता भारताचा दबदबा

टोक्यो पॅरालिम्पिकनंतर झालेल्या हांगझो पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २९ सुवर्णपदकांसह १११ पदकांची कमाई केली होती. पाठोपाठ जागतिक पॅरा स्पर्धेत भारताने सहा सुवर्णपदकांसह ११ पदके मिळवून आपली छाप पाडली होती. आता ही दमदार कामगिरी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कायम राखण्याचा भारतीय खेळाडूंचा मानस असेल.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे ८४ खेळाडू खेळणार असले, तरी एकूण पथक १७९ जणांचे असेल. त्यांच्याबरोबर ९५ अधिकारी असणार आहेत. यात नऊ वैद्याकीय तज्ज्ञांचाही समावेश आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकप्रमाणेच पॅरालिम्पिक स्पर्धेचाही उद्घाटन सोहळा मैदानाबाहेर होणार असून, सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील.

यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य….

यंदाच्या पॅरिलिम्पिक स्पर्धेत १६५ हून अधिक देशांतील ४४०० खेळाडू २२ क्रीडा प्रकारांत ५४९ पदकांसाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. ऑलिम्पिकपाठोपाठ या स्पर्धेचेही उद्घाटन मैदानाबाहेर होणार आहे. या वेळी गोलबॉल आणि बोकिया हे दोनच खेळ नवे असतील, तर १० क्रीडा प्रकारांत महिलांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. एकूण ११ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक दिवशी पदकाच्या लढती होतील. पहिल्या दिवशी पॅरा-तायक्वांदो, टेबल टेनिस, जलतरण आणि सायकलिंग अशा स्पर्धा होणार आहेत.

सुमित, अवनीवर लक्ष

जागतिक विक्रमवीर भालाफेकपटू सुमित अंतिल, रायफल नेमबाज अवनी लेखरा या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीयांचे सर्वाधिक लक्ष असेल. दोघेही टोक्योतील सुवर्णपदक विजेते खेळाडू आहेत. याशिवाय पायाने लक्ष्यभेद करणारी तिरंदाज शीतल देवी, गोळाफेकपटू होकाटो सेमा, रोईंगपटू नारायणा कोंगनापल्ले, नेमबाज मनीष नरवाल, बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यांच्याकडूनही पदककमाईची अपेक्षा बाळगली जात आहे. पॅरा-अॅथलेटिक्समध्ये भारताला सर्वाधिक पदकांची संधी आहे. या प्रकारात भारताच्या ३८ पॅरा-खेळाडूंचा सहभाग असेल.