किंग्ज इलेवन पंजाब संघाचा ओपनर के एल राहूल यानं प्रतिस्पर्धी संघाना इशारा दिला असून ख्रिस गेल परत फॉर्ममध्ये आलाय, जपून रहा असं म्हटलंय. या मोसमातला पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलनं दुसऱ्या क्रमांकाचं स्वत:चं आयपीएलमधलं सगळ्यात वेगवान अर्धशतक झळकावलं. अवघ्या 22 चेडूंमध्ये अर्धशतक झळकावत गेलनं पंजाबच्या विजयाचा पाया रचला. चेन्नई सुपरकिंग्जवर पंजाबनं अवघ्या चार धावांनी विजय मिळवला कारण नंतर महेंद्र सिंग धोनीनं 44 चेंडूंमध्ये 79 धावांची खेळी करताना, तुफानी फटकेबाजी करत चेन्नईला विजयाच्या समीप आणलं होतं. परंतु चेन्नईला विजयासाठी चार धावा कमी पडल्या आणि गेलच्या इनिंगचं सोनं झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेलचा फॉर्म परत येणं ही आमच्यासाठी मस्त बाब आहे तर प्रतिस्पर्ध्यांसाठी चिंतेची असं राहूलनं म्हटसं आहे. सामना संपल्यानंतर संवाद साधताना राहूल म्हणाला की एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता गेलमध्ये आहे. त्याची संघाला आवश्यकता असून त्याचा फॉर्म असाच राहो अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली आहे.

राहूल स्वत:ही टॉप फार्ममध्ये असून पहिल्याचं सामन्यात त्यानं तुफान फटकेबाजी केली होती. विशेष म्हणजे यंदाच्या लिलावामध्ये गेलला मागणी नव्हती. दोनवेळा त्याला कुणी घेतला नाही व अखेर किंग्ज इलेवन पंजाबनं गेलला त्याच्या बेस प्राइसला म्हणजे 2 कोटी रुपयांना घेतला आहे. पंजाबचा पुढचा सामना हैदराबादविरोधात आहे.

आयपीएलमधला प्रत्येक संघ चांगला असून आम्ही आमच्या धोरणाप्रमाणे खेळणार असल्याचे राहूल म्हणाला. मैदानावर आक्रमक क्रिकेट खेळणं हा आमच्या धोरणाचा भाग असल्याचे राहूलने सांगितले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chris gayle back in form warns k l rahul