*  सामना : हैदराबाद सनरायजर्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स
*  स्थळ : राजीव गांधी स्टेडियम, उप्पल
*  वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ खराब फॉर्मातून सावरले असून बाद फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. अव्वल चार संघांमध्ये स्थान पटकावण्यासाठी दिल्ली आणि हैदराबादचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
हैदराबाद सनरायजर्सने मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी मात करून या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीची स्थिती मात्र बिकट आहे. प्ले-ऑफ सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर अन्य संघांच्या निकालावर दिल्लीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मोसमाची वाईट सुरुवात करणाऱ्या दिल्लीला त्यासाठी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हैदराबादचे आव्हान पार करावे लागणार आहे. मात्र हा सामना गमावल्यास दिल्लीचे बाद फेरीतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता जास्त आहे.
हैदराबादचे मैदान हे यजमानांसाठी तटबंदी ठरले आहे. या मैदानावर सनरायजर्सने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. मात्र दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अनुभवी खेळाडू कुमार संगकाराला फलंदाजीत चमक दाखवावी लागेल. शिखर धवनने या मोसमातील तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या धवनकडून सनरायजर्सना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सनरायजर्सची गोलंदाजी पहिल्याच मोसमात प्रभावी ठरली आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन, इशांत शर्मा आणि लेग-स्पिनर अमित मिश्रा यांनी सुरेख कामगिरी करत सनरायजर्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अक्षत रेड्डी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने त्याची सलामीची जागा पार्थिव पटेल घेण्याची शक्यता आहे.
दिल्लीने कोलकाता नाइट रायडर्सवर सात विकेट्सनी मात करून स्पर्धेतील आव्हान अबाधित राखले. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची ६६ धावांची खेळी आणि त्याला मिळालेली उन्मुक्त चंदची (३७) साथ यामुळे दिल्लीला हा सामना जिंकता आला. वीरेंद्र सेहवागला एक सामना वगळता फलंदाजीत अपयश आले आहे. त्यामुळे सेहवागसह कर्णधार महेला जयवर्धने, इरफान पठाण यांना फलंदाजीत योगदान द्यावे लागेल.
गोलंदाजीत पठाण, आशिष नेहरा आणि मॉर्नी मॉर्केल यांच्याकडून उपयुक्त योगदानाची अपेक्षा आहे. हा सामना दिल्लीची फलंदाजी आणि सनरायजर्सची गोलंदाजी असा रंगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेम्स फॉकनर, राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज
ईडन गार्डन्सवर कोलकाताविरुद्ध होणारा सामना राजस्थान रॉयल्ससाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. विजयी मालिका कायम राखण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight for keeping challange