पुण्याचा प्रतीक वाईकर आणि काजल भोर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई</strong>

जयपूर येथील चौगन स्टेडियमवर रंगलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या पुरुषांनी भारतीय रेल्वे, तर महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला पराभूत करत विजेतेपद मिळवले. पुण्याचे प्रतीक वाईकर व काजल भोर अनुक्रमे प्रतिष्ठेच्या एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचे मानकरी ठरले.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गतविजेत्या रेल्वेवर २१-२० असा एका गुणाने निसटता विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात सुरेश सावंत (०.४०, १.३० मि. व ३ गडी), प्रतीक वाईकर (१.२०, १.३० मि. व २ गडी) आणि अनिकेत पोटे (३ गडी) यांनी मोलाची भूमिका बजावली. विलास कारंडे (१.६०, १.२० मि.), अमित पाटील (१.१० मि. व ४ गडी) यांनी रेल्वेचे जेतेपद टिकवण्यासाठी कडवा संघर्ष केला. त्यापूर्वी उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने केरळला, तर रेल्वेने कोल्हापूरला नमवून अंतिम फेरी गाठली होती.

महिला गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने विमानतळ प्राधिकरण संघावर १३-१२ अशी अवघ्या एका गुणाच्या फरकाने मात केली. महाराष्ट्रासाठी प्रियंका भोपी (२.२०, १.२० मि.), काजल भोर (१.३०, १.१० मि. व ३ गडी) आणि अपेक्षा सुतार (२.३५, २.५० मि.) यांनी अप्रतिम कामगिरी केली. पौर्णिमा सकपाळ (२.२०, २.३० मि. व १ गडी), ऐश्वर्या सावंत (२.५०, २.३५) यांनी कडवी झुंज देऊनही प्राधिकरण संघाला विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली.

विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षांव

दुहेरी विजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या खो-खो खेळाडूंवर भारतीय खो-खो महासंघातर्फे बक्षिसांचा वर्षांव करण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी विजेत्या संघाला दोन लाख रुपये, तर प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याशिवाय वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी २१ हजार रुपयेदेखील देण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट                                      पुरुष                       महिला

आक्रमक                       अनिकेत पोटे (महाराष्ट्र)  प्रियंका इंगळे (महाराष्ट्र)

संरक्षक                          अमित पाटील (रेल्वे)     ऐश्वर्या सावंत (वि. प्राधिकरण)

अष्टपैलू                         प्रतीक वाईकर (महाराष्ट्र)  काजल भोर (महाराष्ट्र

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra boys and girls won national kho kho competition title