रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकासाठी शर्यतीत असणाऱ्या सात भारतीय बॅडमिंटनपटूंच्या रिओवारीवर गुरुवारी औपचारिक शिक्कामोर्तब झाले. जागतिक बॅडमिंटन महासंघाने क्रमवारीची घोषणा केली. या घोषणेसह सात भारतीय बॅडमिंटनपटूंची रिओवारी पक्की झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीन येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेनंतर कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूंना रिओचे तिकीट मिळणार हे स्पष्ट झाले होते. मात्र जागतिक महासंघातर्फे जाहीर होणाऱ्या क्रमवारीची प्रतीक्षा होती. ४ मे २०१५ ते १ मे २०१६ या कालावधीतील कामगिरीची नोंद घेत क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार महिला एकेरी, पुरुष एकेरी, महिला दुहेरी, पुरुष दुहेरी या प्रकारात भारतीय बॅडमिंटनपटूंचा सहभाग पक्का झाला.

चार वर्षांपूर्वी लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पाच भारतीय बॅडमिंटनपटू पात्र ठरले होते. भारताची फुलराणी सायना नेहवालने कांस्यपदकासह इतिहास घडवला होता. सायनासह ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, पारुपल्ली कश्यप आणि व्ही. दिजू सहभागी झाले होते.

किदम्बी श्रीकांत आणि पी.व्ही. सिंधू यांच्यासाठी पहिलीच ऑलिम्पिकवारी असणार आहे. पदार्पणातच आपली छाप उमटवण्यासाठी हे दोघेही आतुर आहेत. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीला आपल्या कामगिरीत सुधारणा करायची आहे. या सर्वाच्या बरोबरीने मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडी आपला ठसा सोडण्यासाठी उत्सुक आहेत. प्रसिद्धीचा झोत सायना, सिंधू यांच्यावर असताना सातत्यपूर्ण प्रदर्शनासह या युवा जोडीने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. या दोघांच्या निमित्ताने ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधित्व होणार आहे. विविध देशांचे मिळून १७२ बॅडमिंटनपटूंना रिओवारीची संधी मिळणार आहे.

ज्वाला-अश्विनीची आगेकूच; श्रीकांतची घसरण

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत ऑलिम्पिकमधील स्थान पक्के केलेल्या किदम्बी श्रीकांतच्या स्थानात घसरण झाली आहे. श्रीकांत ११वरून १२व्या स्थानी स्थिरावला आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने एका स्थानाने सुधारणा करत १४वे स्थान गाठले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणार असलेल्या मनू अत्री आणि सुमित रेड्डीची जोडीची एका स्थानाने घसरण होऊन ते २०व्या स्थानी आहेत. सायना नेहवाल आठव्या स्थानी कायम आहे तर पी.व्ही. सिंधू १०व्या स्थानी स्थिर आहे. एच. एस. प्रणॉय २५वे स्थान पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven badminton players qualified for rio olympics