बीअर, वाइन आणि स्पिरिटच्या बाटल्यांच्या सजावटीसाठी केल्या जाणाऱ्या बाह्य़स्तरात शिसे आणि कॅडमिअमसारख्या विषारी घटकांचे प्रमाण हे मानवी आरोग्याला हानीकारक ठरू शकेल इतपत असू शकते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडमधील प्लेमथ विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. बाजारात सहजपणे मिळणाऱ्या पारदर्शक काचेच्या तसेच रंगीत काचेच्या बाटल्यांची त्यांनी तपासणी केली. या बाटल्यांचे काच आणि त्यावर सजावटीसाठी केले जाणारे अर्धपारदर्शक स्तर यांच्यातील घटकांचे त्यांनी विश्लेषण केले.

बाटल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेमध्ये कॅडमिअम, शिसे आणि क्रोमिअम हे सर्वच घटक आढळून आले, पण ते त्यांचे प्रमाण हे पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला मोठय़ा प्रमाणावर हानीकारक ठरू शकेल इतके नव्हते. याउलट या बाटल्यांच्या सजावटीसाठी केल्या जाणाऱ्या बाह्य़ स्तरातील घातक घटकांचे प्रमाण हे चिंता निर्माण करणारे आहे.

बीअर, वाइन आणि स्पिरिटच्या बाटल्यांच्या सजावटीसाठी दिलेल्या बाह्य़ स्तरात कॅडमिअमची घनता ही २० हजार पीपीएम (पार्टस पर मिलियन, म्हणजेच प्रति दहा लाख भागांतील प्रमाण) इतकी आढळली. त्याच वेळी वाइनसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या बाटल्यांच्या सजावटीच्या बाह्य़ स्तरात शिशाचे प्रमाण हे ८० हजार पीपीएमपर्यंत असल्याचे दिसून आले. विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी रंगांमध्ये शिशाचे प्रमाण हे ९० पीपीएमच्या आत असावे, अशी मर्यादा घालण्यात आली आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्न्मेंटल सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beer wine cadmium