रक्तदाब वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी शरीराला हानी पोहोचवू शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा आजार होतो. बीपीच्या आजाराचे रुग्ण देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहेत. सुमारे ३०% भारतीय सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीपी या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार वय, लिंग, आनुवंशिकता, लठ्ठपणा, निष्क्रिय जीवन आणि आहारातील पोषक तत्वांची कमी यामुळे होऊ शकतो. जर बीपी नियंत्रणात राहत नसेल, तर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर होऊ शकतो.
जेव्हा एखाद्याचा बीपी वाढतो तेव्हा त्याला तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे, गोंधळ उडणे आणि त्वचेवर लाल पुरळ दिसणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहार हे दोन महत्त्वाचे घटक आहेत, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात अंदाजे १.१३ अब्ज लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.
जगभरात हृदयविकार आणि अकाली मृत्यूसाठी उच्च रक्तदाब हे प्रमुख कारण आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास या आजाराचा धोका टाळता येतो. जर तुमचा रक्तदाब वाढलेला असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
व्यायाम करा –
तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास राहत असेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल करा. बीपी नियंत्रित करण्यासाठी दिवसातून २०-२५ मिनिटे व्यायाम करा. व्यायामाचा अर्थ असा नाही की तुम्ही जिममध्ये जायला हवं. तुम्ही घरी योगा करा, चाला किंवा सायकल देखील चालवू शकता. योगासने, प्राणायाम यासारखे व्यायाम नियमित करा, यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहील.
व्हिटॅमिन सीचे सेवन करा –
तुम्हाला रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर व्हिटॅमिन सीचे सेवन करा. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यात प्रभावी ठरतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये तुम्ही विशेषतः द्राक्षे, संत्री आणि लिंबू खाऊ शकता.
पालक आणि ब्रोकोलीचा आहारात समावेश करा –
हिरव्या भाज्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. अँटिऑक्सिडेंट्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त भाज्या रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
बेरीचे सेवन करा –
बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, त्यामुळे ते हृदयविकाराचा धोकाही कमी करतात. ब्ल्यूबेरी, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
पोटॅशियम युक्त पदार्थ खा –
पोटॅशियम समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, बटाटे, रताळे, खरबूज, केळी, एवोकॅडो, संत्री, जर्दाळू, नट, बिया, दूध, दही आणि ट्यूनासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.