Besan Poli For Breakfast: अनेक लोक नाश्त्याला दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण आहार मानतात. परंतु, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात, ज्याचे निरीक्षण रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतारांद्वारे केले जाते. सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर रोहन सेहगल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी बेसन पोळीसह लिंबाचे लोणचे, हिरव्या चटणीचे सेवन केले आणि त्याचा परिणाम तपासला.

बेसन पोळी खाल्ल्यानंतर काही तासांनी सहगल यांनी सांगितले की, माझ्या रक्तातील ग्लुकोज फक्त १६ मिलीग्रामने वाढले. माझ्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होण्यासाठी फक्त १.५ तास लागला. हा परिणाम चांगला आहे, कारण बेसनमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, शिवाय ते खूप चविष्टही असतात,” असे सेहगल म्हणाले.

परंतु, काही काळापूर्वीच मेटाबॉलिक हेल्थ कोच करण सरीन यांनीही त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर एका बेसन पोळीचा (५० ग्रॅम पिठापासून बनवलेला) परिणाम तपासला.

त्यांच्या मते, वाढ ४० पेक्षा जास्त होती. “ती ३० पेक्षा कमी असायला हवी होती,”असे सरीन म्हणाले.

या परस्परविरोधी निकालांमुळे इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रत्यक्षात काय होते याचा शोध घेण्याचे ठरवले.

डॉ. के. हेमंत कुमार, सल्लागार म्हणाले की, ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) हा एक सामान्यतः वापरला जाणारा पॅरामीटर आहे, जो विविध पदार्थ रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवू शकतात हे मोजण्यास मदत करतो. रँकिंग ० ते १०० च्या स्केलवर आधारित आहे आणि उच्च जीआय असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवतात. “मधुमेह असलेल्या लोकांसाठी उच्च जीआय असलेले पदार्थ त्यांच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण बनवू शकतात,” असे डॉ. कुमार म्हणाले.

मुंबईतील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल म्हणाल्या की, बेसनचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजेच ते सेवन केल्यावर रक्तातील साखरेची पातळी जलद वाढत नाही. “बेसनमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. बेसनमध्ये फायबर असल्याचेदेखील ओळखले जाते, जे पचनक्रिया मंदावण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.”

बेसनमध्ये जटिल कार्बोहायड्रेट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी न वाढवता हळूहळू पचतात. “त्यात फोलेट, लोह आणि मॅग्नेशियमदेखील असल्याचे ज्ञात आहे, जे एकूण आरोग्यासाठी योगदान देऊ शकते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते,” असे पटेल म्हणाल्या.

बेसन पोळी खाण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉ. कुमार यांच्या काही टिप्स येथे आहेत:

प्रोटीनबरोबर बनवा
सायलियम भुसा घाला
भाज्यांसह बनवा
चटण्यांसह खा

काय लक्षात घ्यावे?

बेसन पोळी पौष्टिक आहे, परंतु त्यातील सोडियमचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवर परिणाम होऊ शकतो.

“काही लोकांना बेसनची अ‍ॅलर्जी असू शकते. बेसन जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटफुगी आणि गॅस होऊ शकतो. मधुमेह असलेले लोक त्यांच्या दैनंदिन आहारात बेसनचा समावेश करू शकतात, परंतु संतुलित आहाराचा भाग म्हणून ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे, असे डॉ. कुमार म्हणाले.