मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे मिळतात. हिरवा मूग सर्वश्रेष्ठ आहे. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहेत. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त पडतात.  ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा. जीर्णज्वरांत ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिवळय़ा मुगास कीड लवकर लागते. त्यांच्यात भुंगे लवकर होतात. त्यामुळेच की काय, पिवळय़ा मुगाची पैदास खूपच कमी आहे. पिवळय़ा मुगाची सर हिरव्या मुगाला येत नाही. पिवळय़ा मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक आहे. थोडी पिठीसाखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळय़ा मुगाचे पीठ उत्तम टॉनिक आहे. कृश मुले, दुपारी उशिरा जेवणारी मंडळी यांनी सकाळी चहाऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या मुगाच्या पिठाचे लाडू खावे. माझ्या मुंबईच्या तीन दिवसांच्या मुक्कामी मी मुगाचे दोन लाडू सकाळी खाऊन त्यानंतर दुपारी एकपर्यंत अखंड काम करू शकतो. बाळंतिणीस भरपूर दूध येण्याकरिता मुगाच्या पिठाचे लाडू तत्काळ गुण देतात. शारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी. खूप लठ्ठ व्यक्तींनी मुगाची आमटी नियमित घ्यावी. कृश व्यक्तींनी मुगाची उसळ खावी. मुगामुळे मेद वाढत नाही, पण स्नायूंना बळ मिळते.

अर्धागवात, संधिवात, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ, जलोदर, सर्दी-पडसे, खोकला, दमा, स्वरभंग या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक अन्न आहे. त्याकरिता मूग भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कढण हे अर्धागवात, मधुमेह, रक्तदाबवृद्धी या विकारांत उपयुक्त आहे. घशाच्या, जिभेच्या, गळय़ाच्या कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणे त्रासाचे होते त्या वेळेस हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन:पुन्हा पाजावे. शरीर तग धरते. आयुष्याची दोरी बळकट असली तर नुसत्या मुगाच्या पाण्यावर माणसे कॅन्सरवर मात करू शकतात. मधुमेहात भरपूर मूग खावे. थकवा येत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moong dal health benefits nck