डॉ. हर्षवर्धन घोरपडे, नेत्रतज्ज्ञ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचेंद्रियांपैकी एक असले   ल्या डोळ्याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. वयानुरूप इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांची क्षमताही कमी होते. काही वेळा डोळ्यांवर ताण येऊन, डोळ्यांचा एखादा आजार होऊनही दृष्टी अधू होऊ शकते. त्याचप्रमाणे संसर्गजन्य आजार किंवा जीवनशैलीजन्य आजार- ज्यांचा डोळ्यांशी थेट संबंध नाही- त्यांच्यामुळेही डोळ्यांच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. वेळीच लक्षात आले नाही तर दृष्टी जाण्यापर्यंत परिणामांचे गांभीर्य वाढते. मधुमेह, रक्तदाब व अगदी डेंग्यूसारख्या आजारानेही डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे हे आजार असलेल्यांनी डोळ्यांच्या आरोग्याबाबतही जागरूक राहायला हवे.

मधुमेह :  मधुमेह म्हणजे रक्तातील साखर अनियंत्रित वाढण्याचा आजार. रक्त हे शरीरात सर्वच अवयवांपर्यंत पोहोचत असल्याने रक्तामध्ये वाढलेल्या साखरेचा परिणामही अक्षरश: प्रत्येक अवयवावर होतो. पायापासून डोळ्यांपर्यंत सर्व अवयव मधुमेहामध्ये बाधित होतात. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात न राहिल्याने काही वेळा रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात आणि अंतर्गत रक्तस्राव होतो, तर अनेकदा रक्तवाहिन्यांच्या भिंतीचे आवरण जाड होते. यामुळे शरीरासाठी आवश्यक ऑक्सिजन व प्रथिने पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. मधुमेहामुळे डोळ्यातील दृष्टिपटलाला (रेटिना) त्रास संभवतो. या दृष्टिपटलाला रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. परिणामी दृष्टिपटलाचे काही भाग निकामी होतात. ही प्रक्रिया मंदगतीने होत असल्याने रुग्णाला त्याची जाणीव उशिरा होते. वाढलेल्या साखरेमुळे डोळ्यातून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. याला ‘डायबेटिक रेटिनोपथी’ असे म्हणतात. १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक काळ मधुमेह असलेल्यांना याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मधुमेहींनी वर्षांतून एकदा तरी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. रक्तातील साखरेचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असलेल्या रुग्णांना काचबिंदूही होण्याची शक्यता असते.

रक्तदाब : रक्तदाब वाढण्याचा परिणाम हादेखील मधुमेहासारखाच असतो. रक्तदाब वाढण्याचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्येही रक्ताचा अतिरिक्त दाब निर्माण होतो. त्याच्या परिणामस्वरूप रक्तस्राव होतो. या रक्तदाबामुळे मेंदूमध्येही दाब वाढतो. यामुळे काही वेळा मेंदूची नस दाबली जाण्याची शक्यता असते. मेंदूवरील दाब वाढल्यामुळे मेंदूला धोका असतोच, शिवाय रक्तवाहिनी बंद झाल्याने डोळ्यात रक्त जमा होण्याचाही धोका वाढतो. या सगळ्याचा परिणाम अर्थातच डोळ्यावर होतो. यात डोळे पांढरे होणे किंवा दृष्टीही जाऊ शकते. रुग्णांच्या शरीरातील रक्तदाब कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

संधिवात : संधिवातामुळे डोळ्यांमधील बाहुलीचा अल्सर होण्याची शक्यता असते, तर अनेकदा डोळ्याचा पांढरा भाग लाल होतो. अशा वेळी पांढऱ्या भागाचे प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता निर्माण होते. डोळ्यांच्या बाहुलीबरोबरच डोळ्यांच्या मागच्या पडद्यावरही संधिवाताचा परिणाम दिसून येतो.

डेंग्यू : डेंग्यू या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर काही वेळा दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे डेंग्यू होतो. या डासावाटे शरीरात शिरकाव केलेले विषाणू शरीरभर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी शरीरातील पेशी या विषाणूंचा सामना करतात. त्यामुळे काही वेळा त्या भागातील अवयवांनाही इजा होते. हे विषाणू डोळ्यांजवळील पेशींजवळ गेले तर डोळ्यांच्या पापण्यांपासून मागच्या पडद्यापर्यंत दाब येतो. डोळा सुजतो व लाल होतो. डोळ्याची बाहुलीही पांढरी होते. अनेकदा हा संसर्ग पसरू नये यासाठी डोळा काढण्याची वेळ येते. त्यामुळे डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर डोळ्यावर काही परिणाम दिसून येत असेल तर तातडीने डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

थायरॉइड : हायपर व हायप्रो या थायरॉइडच्या दोन्ही प्रकारांचा डोळ्यांवर परिणाम होतो. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे थायरॉइडची पातळी कमी जास्त होते. या प्रकारात डोळ्यांना सूज येणे, डोळे मोठे होणे, पापण्यांना सूज येणे अशी लक्षणे दिसतात. थायरॉइडमुळे डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात. परिणामी डोळ्यांच्या हालचालीवर परिणाम होऊन नजर कमी होते.

हृदयविकार : कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाले की हृदयाकडे व हृदयापासून रक्तपुरवठा होत नाही. त्याचाच परिणाम हृदयविकाराच्या झटक्यात होतो. हेच कोलेस्टेरॉल डोळ्यांना रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या अंतर्गत भिंतीवर जमा होतात. डोळ्यांपर्यंत रक्त व त्यातून पोहोचणारे अत्यावश्यक घटकच पोहोचले नसल्याने डोळ्यांसमोर अंधारी येते. यावर तातडीने उपचार केले नाहीत तर आंधळेपणा येण्याची शक्यता असते. शरीरात युरिक अ‍ॅसिड, काबरेहायड्रेट, कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे डोळ्यावर परिणाम होऊ  शकतो. याला मेटाबोलिक आजार म्हणतात.

कावीळ : रक्तातील तांब्याचे प्रमाण वाढल्यामुळे उद्भवणाऱ्या विल्सन आजारातून काविळीची लागण होते. विल्सन आजारात ‘सेरुलोप्लाझमिन’ या मूलद्रव्याचे प्रमाण निर्णायक ठरते. सेरुलोप्लाझमिन हे एक प्रकारचे प्रथिन असून रक्तातील ९५ टक्के तांबे सेरुलोप्लाझमिनने वेढलेले असते. रक्तातील अतिरिक्त तांबे बाहेर काढण्यासाठी ‘सेरुलोप्लाझमिन’चा उपयोग होतो. ‘सेरुलोप्लाझमिन’चे शरीरातील प्रमाण कमी झाल्यास पित्ताशयात तांबे साचून त्याच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. या आजारात डोळ्यांच्या बुब्बुळाच्या तंतुमय पटलावर (श्वेतमंडल) परिणाम होतो. या आजारात काही काळासाठी दृष्टी जाण्याची शक्यता असते. अनेकदा रुग्णाला मोतीबिंदू होण्याचीही शक्यता असते. मात्र शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढता येतो.

क्षयरोग : क्षयरोगाचे जिवाणू डोळ्यांजवळ पोहोचल्यास त्यांचा संसर्ग होऊन डोळ्यांचा क्षयरोग होण्याची शक्यता असते. या आजारात डोळे लाल होणे, सातत्याने दुखणे ही लक्षणे दिसतात. त्यामुळे बराच काळ डोळ्यांच्या समस्या जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता वेळीत नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनेकदा इतर प्रकारांतील क्षयरोग झाल्यास त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. या अ‍ॅलर्जीमुळे डोळ्यांच्या मागच्या पडद्याला सूज येणे, दृष्टी कमी होणे आदी परिणाम दिसून येतात.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diseases that affect the eyes eyes diseases