ज्येष्ठ बंगाली कवी, समीक्षक शंख घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक विद्रोह हा घोष यांच्या सृजनशील लेखनाचा अंगभूत घटक. कवितेतील गुणवत्तेसंबंधी अतिशय सजग असलेले घोष हे आपल्या कवितेच्या प्रेरणाशील स्फूर्तीशी नेहमीच प्रामाणिक राहिले. त्यांची कविता मानवी संवेदनांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म लहरींना आपल्यात सामावून घेणारी आणि वाचकाला आपल्या प्रभावातून कधीच मुक्त न होऊ देणारी आहे.
ज्येष्ठ कवी, समीक्षक आणि रवींद्रनाथ ठाकूर साहित्यविद् शंख घोष यांना या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याचे नुकतेच जाहीर झाले. घोष यांच्या निमित्ताने २० वर्षांच्या कालखंडानंतर ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली साहित्याकडे आला. याआधी बंगाली भाषेतल्या ताराशंकर बंडोपाध्याय, विष्णू डे, आशापूर्णा देवी, सुभाष मुखोपाध्याय आणि महाश्वेता देवी या साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला होता.
शंख घोष हे मुख्यत: कवी म्हणूनच परिचित असले तरी त्यांनी विपुल गद्यलेखनही केलेले आहे. बंगाली कविता आणि गद्यलेखनातील अभिव्यक्तीला एक विशेष रूप देण्यात घोष यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्यानंतरच्या लागोपाठ दोन पिढय़ांतल्या कवी आणि लेखकांवर त्यांचा प्रभाव दिसून येतो.
घोष यांचा जन्म त्रिपुरा राज्यातील चांदपूर गावात (आता बांगलादेशात) ६ फेब्रुवारी १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील स्व. मणींद्रकुमार हे मुख्याध्यापक आणि ख्यातकीर्त व्याकरण आणि भाषाविद् होते. शंख घोष यांची शैक्षणिक प्रगती विलक्षण म्हणावी अशीच होती. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात तर ही प्रगती दिसलीच; पण बंगाली विषय घेऊन बी. ए.च्या परीक्षेत बंकिमचंद्र पदक मिळवून, तसेच एम. ए.च्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ती विद्यापीठीय शिक्षणातसुद्धा दिसली. बंगवासी कॉलेज, जंगीपूर कॉलेज, बहरामपूर गर्ल्स कॉलेज आणि सिटी कॉलेजमध्ये त्यांनी १९५५ ते १९६५ दरम्यान अध्यापनाचे काम केले आणि एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांची ख्याती पसरली. १९६५ मध्ये ते कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठात रुजू झाले आणि तिथूनच १९९२ मध्ये निवृत्त झाले. १९८९-९० दरम्यान त्यांनी विश्वभारती, शांतिनिकेतनमधल्या टागोर मेमोरिअल रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संचालकपदही भूषविले. रवींद्रनाथ यांच्या साहित्याचे अग्रगण्य तज्ज्ञ म्हणून त्यांना प्राप्त झालेली मान्यता निर्विवाद होती. १९९४ ते २००४ या दहा वर्षांच्या काळात घोष यांनी रवींद्रनाथांच्या संपूर्ण साहित्याचे संपादन केले आणि पश्चिम बंगाल सरकारने ही संपादने प्रकाशित केली.
आपल्या ‘यमुनावती’ या कवितेमुळे शंख घोष एक अतिशय महत्त्वाचे कवी म्हणून बंगाली साहित्यरसिकांत मान्यता पावले. १९६१ मधल्या खाद्य आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात एक ग्रामीण मुलगी मारली गेली, ही घटना ‘यमुनावती’ या कवितेची मूळ प्रेरणा होती. अगदी तेव्हापासूनच सामाजिक विद्रोह हा त्यांच्या सृजनशील लेखनाचा अंगभूत घटक बनला. कवितेतील गुणवत्तेसंबंधी अतिशय सजग असलेले घोष हे आपल्या कवितेच्या प्रेरणाशील स्फूर्तीशी नेहमीच प्रामाणिक राहिले. त्यांची कविता मानवी संवेदनांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म लहरींना आपल्यात सामावून घेणारी आणि वाचकाला आपल्या प्रभावातून कधीच मुक्त न होऊ देणारी आहे. ‘दिनगुली रातगुली’ या १९५६ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहात व्यक्तिगत संवेदन आणि जाणिवा सामाजिकतेशी एकरूप करण्याचा आटोकाट प्रयत्न दिसतो, तर नंतरच्या ‘निहितो पाताळछाया’ (१९६७) या कवितासंग्रहात हा प्रयत्न अधिक गंभीर आणि परिपक्व स्वरूपात आपल्यासमोर येतो. या संग्रहातल्या कवितांमध्ये सामाजिक, राजकीय गदारोळाला आणि अनाठायी आक्रमकतेला ठामपणे केलेला विरोधही दिसतो. अतिशय गंभीर विषय तीव्र संवेदनशीलतेने, संयत स्वरात, भाषिक तोल जराही न ढळू देता कवितेत व्यक्त करणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. सामाजिक मूल्यऱ्हास, यंत्रयुगाने लादलेले मानवी वर्तन आणि विचारांचे होत चाललेले सुलभीकरण, त्यातून फोफावणाऱ्या विकृती असे विषय त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी राहिले. म्हणूनच त्यांच्या कवितांतून एक अंधकारमय जग नेहमीच आपल्याला दिसतं आणि त्यांची बेहद्द कल्पनाशक्ती कधीच भरून न येणाऱ्या या ऱ्हासाची सूचना सतत आपल्याला देत राहते. त्यांच्या ‘बाबरेर प्रार्थना’ (१९७६) या कवितासंग्रहाला १९७७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तीन विल्ह्यंत विभागलेल्या एकूण ४७ कवितांचा हा संग्रह आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये १५ कविता, ‘खार’मध्ये १४ कविता आणि ‘हातिमताई’ या तिसऱ्या विल्ह्यमध्ये १८ कविता अशी ‘बाबरेर प्रार्थना’ या कवितासंग्रहाची रचना आहे. हुमायून अकालीच मरणासन्न आजारी झाल्याने बाबरने आपलं आयुष्य हुमायूनला लाभावं अशी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, अशी घटना इतिहासकारांनी- विशेषत: अबुल फझलने वर्णन केलेली आढळते. त्या घटनेचा संदर्भ या कवितेला आहे. कवितेच्या रूप, तंत्रादींवरची पकड, दैनंदिन जगण्याची भाषा, संपन्न प्रतिमासृष्टी आणि विलक्षण संवेदनशीलतेने विचारांच्या आवाक्यात आणलेला सामाजिक संघर्ष असे केंद्र असल्याने ‘बाबरेर प्रार्थना’मधल्या कविता लक्षणीय म्हणाव्या लागतात.
शंख घोष साधारणत: बंगाली साहित्य परंपरेत पाचव्या दशकातले कवी म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांनी स्वत:ला साहित्यवर्तुळातल्या कुठल्याही कंपूशी जोडून घेतले नाही. त्यांच्या पिढीतले त्यांचे समकालीन कवी म्हणजे आलोकरंजन दासगुप्ता, शक्ती चट्टोपाध्याय आणि सुनील गंगोपाध्याय. घोष यांचे कविताविशेष तात्काळ जाणवतात ते ‘शृंखला’, ‘मार्चिग साँग’, ‘चाप सृष्टी कोरून’, ‘भिखरी छेलेर अभिमान’, ‘एई रकमी’, ‘बाबरेर प्रार्थना’ आणि ‘मोराग झुंटी’ या कवितांमधून! वरकरणी सोपी वाटणारी, पण अर्थाचे कितीतरी स्तर बोलके करणारी शब्दकळा, लय याही बाबी त्यांच्या कवितांच्या संदर्भात स्वतंत्र विचार करायला भाग पाडतात. आपल्या कवितेचा स्वतंत्र स्वर आणि शैली शोधत, विकसित करत शंख घोष यांनी आपला काळ आणि आपला समाज मोठय़ा कौशल्याने शब्दबद्ध केला आणि आपल्या प्रत्येक नवीन कवितासंग्रहाबरोबर एक नवीन विश्व त्यांनी वाचकांसमोर आणले. आधी उल्लेख केलेल्या कवितासंग्रहांशिवाय घोष यांचे ‘आदिम लता गुल्ममय’ (१९७२), ‘प्रहार जोडा त्रिताल’ (१९८२), ‘धूम लेगेछे हृत्कमले’ (१९८७), ‘गांधर्व कविता गुच्छ’ (१९९४), ‘चांदेर भितरे एतो अंधकार’ (१९९९) आणि ‘जल-ए पाषाण हए आछे’ (२००४) हे अन्य संग्रह होत. समाजमूल्यऱ्हासाच्या जाणिवेतून आलेल्या प्रखर निराशेतून बाहेर पडून संतुलित मनोवस्थेपर्यंत येण्यासाठी घोष आपल्या कवितेत क्रोध, उपरोध यांच्या साह्यनेही व्यक्त होताना कवितासंग्रहांतून दिसतात.
बंगाली साहित्याच्या परंपरेत घोष समीक्षक म्हणूनही अतिशय महत्त्वाचे ठरतात. रवींद्रनाथ ठाकूरकालीन आणि त्यानंतरच्या बंगाली साहित्याची त्यांनी केलेली समीक्षा सवरेत्कृष्ट मानली जाते. रवींद्रनाथांच्या संपूर्ण साहित्याच्या यथोचित आकलनासाठी शंख घोष यांची समीक्षा आद्य म्हणावी अशी आहे. पुस्तकरूपाने त्यांची समीक्षा ‘नि:शब्देर तर्जनी’, ‘शब्द आर सत्य’, ‘कल्पनार हिस्टीरिया’, ‘कविता लेखा कवितापद’, ‘कविर बर्मा’, ‘इसारा अविरत’, ‘ई अमीर आवरण’, ‘निर्माण आर सृष्टी’ आणि ‘कविर अभिप्राय’मध्ये प्रकाशित झालेली आहे.
कविता, समीक्षेशिवाय शंख घोष यांनी निबंध, किस्सेवजा संस्मरणे तर लिहिली आहेतच; शिवाय लहान मुलांसाठीही त्यांनी आवर्जून लिहिले आहे.
आपल्या सृजनाभिव्यक्तीतली प्रयोगशीलता कधीही न सोडणाऱ्या या प्रसिद्धीपराङ्मुख कवी- लेखकाला यापूर्वी नक्षत्र पुरस्कार (१९७६), नरसिंह दास बेंगाली प्राइझ (१९७७); साहित्य अकादमी पुरस्कार (१९७७); कुमारन आसन पुरस्कार (१९८२), शिरोमणी पुरस्कार (१९८८), रवींद्र पुरस्कार (१९८९), मतिलाल पुरस्कार (१९९०), कमलकुमारी फाऊंडेशन पुरस्कार (१९९२), भारतीय भाषा परिषदेचा स्वर्णाचल पुरस्कार (१९९४), सरस्वती सन्मान (१९९८), अन्नदाशंकर स्मारक पुरस्कार (२००४) इत्यादी सन्मान प्राप्त झाले आहेत.
शंख घोष यांच्या बऱ्याचशा कविता हिंदी, मराठी, मल्याळम्, पंजाबी, इंग्रजी, आसामी आणि काही परदेशी भाषांमध्येही अनुवादित झालेल्या आहेत.
‘सीआयटी रोडच्या वळणावर/ हात पसरून झोपलीय माझी मुलगी फुटपाथवर/ एनॅमलची एक वाटीय तिच्या छातीशी/ तिला मिळालेल्या भिकेवर आज पाऊस पडलाय दिवसभर/ म्हणून कळूच शकलं नाही मला कोणता आवाजय तिच्या रडण्याचा/ आणि कोणता पावसाचा/
त्या दिवशी जेव्हा ती हरवली होती/ गल्लीबोळांच्या चक्रात/ तेव्हा रडली होती तशीच/ जशा रडतात अनाथ मुली/ तेव्हा मी म्हणालो होतो कसली भीती/ मी तर मागेच होतो तुझ्या/ पण, मलाही वाटते भीती/ जेव्हा ती झोपी जाते/ आणि ढगांना फाडून/ तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर पसरतो/ प्रकाशाचा एक टुकडा!’
ही अगदी काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेली ‘भीती’ नावाची त्यांची कविता! आरंभीपासून आपल्या साहित्य आणि समाजविषयक ज्या निष्ठा घोष अंगी जोजवत आले त्या आजपर्यंत नुसत्या कायमच राहिलेल्या नाहीत, तर वरचेवर विकसित आणि परिपक्व होत गेलेल्या आहेत. त्यांच्यानिमित्ताने २० वर्षांच्या खंडानंतर ज्ञानपीठ बंगाली भाषेकडे आल्याने बंगाली साहित्यवर्तुळात आश्चर्य नाही, केवळ आनंदच आहे.
कृष्णा किम्बहुने krishnakimbahune@gmail.com