maharwada drama and book by gangadhar vishwanath gokhale published in 1935 zws 70 | Loksatta

कस्तुरीगंध : कालचा आणि आजचाही ‘महारवाडा’

३५ मधलं. हा काळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांच्यातल्या संघर्षांने व्यापलेला काळ आहे.

कस्तुरीगंध : कालचा आणि आजचाही ‘महारवाडा’
१९३५ सालात प्रकाशित झालेल्या तीन अंकी ‘महारवाडा’

प्रा. विजय तापस

अगदी अलीकडे- वर्षभरापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार, आता महाराष्ट्र राज्यात कोणत्याही वस्तीचा उल्लेख जातीवाचक असण्याला बंदी घालण्यात आली आहे. हा अध्यादेश काढणारी शासन यंत्रणा गेल्या चार-दोन शतकांत गावागावांतल्या ज्या वस्त्या बौद्ध वस्ती, महारवाडा, मांग वस्ती, सुतार आळी, चांभार वस्ती, शिंपी वस्ती, ब्राह्मण आळी, तांबट गल्ली अशा जातीनुसार ओळखल्या जात होत्या आणि आजही ओळखल्या जातात, त्यांना नवीन नावं देणार आहे याची तुम्हाला कल्पना आहे का हो? असा निर्णय व्हायला प्रागतिक विचारांच्या, सामाजिक सुधारणेचा भला लांबलचक इतिहास असलेल्या आणि रोजच्या रोज फुले-शाहू-आंबेडकर यांचा नामजप करूनच दिवसाची सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्राला कालपरवा जाग यावी ही विलक्षण गोष्ट नाही का? कालचा भारत आणि कालचा महाराष्ट्र यांचा इतिहास कितीही देदीप्यमान असला तरी याच महाराष्ट्राने जातीपातींचे नानाविध रोग आणि जातीद्वेषाचे जालीम अजगर अत्यानंदाने पाळले, पोसले नव्हते का? आजही हे असे दहाचा आकडा मस्तकावर मिरवणारे विषारी सर्प अन् माणसामाणसांतलं भलेपण गिळंकृत करणारे अजगर सर्वत्र सत्ता गाजवताना दिसत नाहीयेत का? शंभरातल्या किमान नव्वद लोकांना या प्रश्नांची उत्तरं चांगलीच माहिती आहेत. आपला भयानक, अमानुष म्हणावा असा इतिहास जमेला धरूनच आजही आपल्याला बोलावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. हाच इतिहास आज पुन्हा एकदा आपल्या समोर येणार आहे तो १९३५ सालात प्रकाशित झालेल्या तीन अंकी ‘महारवाडा’ या  नाटकाच्या रूपाने. गंगाधर विश्वनाथ गोखले हे या नाटकाचे जन्मदाते. त्यांनी नाटक लिहिलं आणि पुस्तकरूपाने प्रकाशितही केलं. या पुस्तकाची किंमत होती अवघी आठ आणे. पण ते असो. नाटय़ेतिहासात या नाटकाचा ‘अस्पृश्योद्धार चळवळीचा आग्रह धरणारं नाटक’ म्हणून वारंवार उल्लेख झालेला दिसतो. अर्थात एका ‘गोखले’ कुलोत्पन्नाने महारांचा कैवार घेत नाटक लिहावं यासाठी त्याच्या पदरात जी काही शिव्याशापांची मापटी रिती करायची, ती तेव्हा रिती झालीच यात आश्चर्य नाही. अर्थात नाटककार गंगाधर विश्वनाथ गोखले ही कुणी साधीसुधी व्यक्ती नव्हती, हे मात्र नक्की.

गंगाधर गोखले हे कोल्हापूरचे. त्यांचा जन्म १८८९ चा आणि मृत्यू महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरचा.. २ ऑक्टोबर १९६० चा. ७१ वर्षांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस समाज आणि राष्ट्रकार्याप्रतिच खर्च करणार अशा वचनबद्धतेनंच ते जगले असं म्हणायला हवं.

१९०९ च्या बॉम्ब कट खटल्यात गोखले यांना सक्तमजुरी भोगावी लागली होती. त्यानंतर काही काळ ते टिळकांसोबत होते. याच सुमारास ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला तोंड फुटलं तेव्हा ‘साप्ताहिक संग्राम’ आणि ‘विजय धर्म’ अशी दोन वृत्तपत्रे चालवून त्यांनी हे वाद चांगलेच जिवंत ठेवले. याशिवाय त्यांनी विविध वृत्तपत्रांतून कृष्णद्वैपायन, शिवगंगाधर या टोपणनावांनी लिखाण केलं असं म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे ‘कृष्णद्वैपायन’ या नावाने गोखल्यांनी सडेतोड नाटय़समीक्षाही केली.

गोखले यांच्या काळात पत्रकारितेबरोबरच नाटय़लेखन करणं ही फारच नैसर्गिक क्रिया झाली होती. या नैसर्गिक रीतीला धरून गोखल्यांनी ऐतिहासिक, पौराणिक आणि अस्सल सामाजिक म्हणता येतील अशी पंचवीसेक नाटकं लिहिली. त्यातलं ‘संगीत प्राणप्रतिष्ठा’ नामक नाटक स्वराज्याचं तोरण बांधण्याच्या ऐतिहासिक प्रसंगावर, तर ‘संगीत सैरंध्री’ हे कीचकवधावर आधारलेलं नाटक होतं. ‘विद्यार्थी’, ‘कॉलेजकुमारी’, ‘बुवाबाजी’, ‘बहीणभाऊ’, ‘निर्वासित’ ही त्यांची संपूर्ण सामाजिक विषयांवरील नाटकंही लोकप्रिय झाली होती. ‘बालमोहन नाटक मंडळी’ आणि  ‘अरुणोदय’ अशा नाटक कंपन्याही त्यांनी काढल्या असं कुठे कुठे नमूद केलेलं आहे.

गोखल्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी काहीच रंगभूमीवर आली. त्यांच्या नाटकांमध्ये ‘संगीत विद्यार्थी’ हे विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तीविरोधावर बेतलेलं नाटक जसं आहे, तसंच ‘कॉलेजकुमारी’ हे नाटक फॅशनच्या आहारी गेलेल्या तरुणीच्या जीवनशैलीचं चित्रण करणारं नाटकही आहे. ‘नवे राज्य’ या नाटकातून त्यांनी एका प्रथितयश साहित्यिकाच्या ढोंगी व्यवहाराचं चित्र रेखाटलं आहे. या सामाजिक नाटकांशिवाय त्यांनी ‘संगीत सैरंध्री’ हे पौराणिक नाटकही लिहिलं आहे. या शाहिराची कहाणी राम जोशी यांच्याशी नातं सांगणारी आहे. आज त्यांच्या ‘महारवाडा’ या नाटकाचा गाभा काय आहे ते पाहू या.

गोखले यांचं ‘महारवाडा’ हे नाटक आहे १९३५ मधलं. हा काळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांच्यातल्या संघर्षांने व्यापलेला काळ आहे. यापूर्वी आपण गोखल्यांनी चालवलेल्या दोन वृत्तपत्रांचा उल्लेख पाहिला आहे. मात्र, त्या काळाच्या पूर्वी आणि या वृत्तपत्रांना समांतर अशी काही ज्वालाग्राही, हट्टी आणि जबरदस्त फॅन फॉलोइंग असणारी साप्ताहिकं, पाक्षिकं, दैनिक वृत्तपत्रंही तेव्हा अस्तित्वात होती. त्यात श्रीपतराव शिंदे यांनी १९१९ पासून बत्तीस र्वष अपार निष्ठेने चालवलेलं ‘विजयी मराठा’, १९१७ पासूनचं सत्यशोधकीय ‘जागृती’, १८७७ पासून कार्यरत असणारं कृष्णराव भालेकरांचं ‘दीनबंधु’, गणपतराव पाटलांचं ‘दीनमित्र’, शिवराम महादेव परांजपे यांचा ‘काळ’ आणि १९२८ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक-राजकीय ऊर्जेतून निर्माण झालेलं ‘समता’ यांचा उल्लेख अपरिहार्यच आहे. यात ‘केसरी’ आणि भोपटकरांचा ‘भाला’ही अतितीक्ष्ण क्षेपणास्त्रे मिळवली की त्या काळात केवढे वैचारिक राडे रोजच्या रोज घडत असतील याची पुसटशी का असेना, कल्पना आपल्याला येऊ शकते.

गं. वि. गोखले यांनी हे नाटक लिहिण्यापूर्वी महाराष्ट्रात सामाजिक आणि नंतर राजकीय दृष्टीने फार मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या दोन अनन्य मोलाच्या मोठय़ा घटना घडल्या होत्या हे आपण विसरतो म्हटलं तरी विसरून चालणार नाही. एका दिशेला महात्मा गांधी यांची अस्पृश्यता अंताची प्रामुख्याने फिलॉसॉफिकल वा वैचारिक स्तरावरची चळवळ आणि दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेविरोधात मांडलेला एल्गार! लक्षात घ्या, ‘महारवाडा’ अवतरला तेव्हा डॉ. आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चवदार तळे आंदोलनाला नऊ आणि काळाराम मंदिर प्रवेशाला पाच र्वष होऊन गेली होती. त्यात भर म्हणजे १९३५ मध्येच त्यांनी धर्मातराची घोषणा केली होती. प्रत्यक्षात धर्मातराची घटना घडली १९५६ मध्ये. या सर्व घटना इतक्या तीव्र आणि इतका दूरगामी परिणाम घडवून आणणाऱ्या होत्या, की या घटना घडण्यापूर्वी आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक अतुलनीय अशी सामाजिक घुसळण घडून आली. या घुसळणीचे परिणाम सवर्ण-अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या तोवरच्या परस्परसंबंधांवर आणि गावगाडय़ावर पडत होते. यात पुराणमतवादी वा सनातनी, इंग्रजी विद्या अंगी बाणवलेले नवमतवादी, सुधारक असे सारेच आपापल्या भूमिकांचा रेटा वाढवत होते. याच सामाजिक घुसळणीच्या प्रभावात समाजातील अनेक भेदाभेदांनी सामाजिक आणि पर्यायाने राजकीय वातावरणाचा अवकाश व्यापून टाकला होता. या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर, शिक्षित-अशिक्षित, महार-मराठे, मराठे-ब्राह्मण, मराठा-महार आणि मराठे-मराठेतर यांच्यातलं शत्रुत्व म्हणा, स्पर्धा म्हणा, अतिजहाल होऊन पार विकोपाला गेली होती. डॉ. आंबेडकरांनी घडवून आणलेली आंदोलनं म्हणजे प्रकट एल्गार असला तरी त्याची सुरुवात महात्मा फुले यांनी आणि त्यांच्याही अगोदर काही प्रमाणात लोकहितवादींनी केली होती असं म्हणता येईल.

गोखले यांचा ‘महारवाडा’ हे नाटक तीन अंकी, तिन्ही अंकांत मिळून तेरा प्रवेशी आणि चक्क एकवीस पदांनी नटलेलं आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात- त्यातही संगीत नाटकात ‘नांदी’चं स्थान काय, हे जाणत्यांना मी कोण सांगणारा? मात्र, ईशस्तवनरूप नांदीला पूर्ण छेद देणारी आणि  जळजळीत सामाजिक सत्य सांगणारी ‘महारवाडा’ची नांदी विलक्षण आहे. ‘‘घाला हो बाई घाला! गरिबाला भीक घाला! महारीण आली दारी जीव भुकेला॥ ध्रु ॥ याति मति हीन, दीन अभागी हेतू न कांही निराळा॥ १॥ सकल जनांची उष्टावळ द्यावी! घांस गोड दही काला॥ २॥ आंस मनीची पुरवा माऊली, तळमळ लागे जीवाला॥ ३॥’’  या अशा पदाने खानदानी मराठा गृहिणीला आळवणाऱ्या काशीच्या तोंडी पुढचं वाक्य काय आहे पाहा. ती म्हणते, ‘‘वाढा हो बाई, शिळपाकं, उष्टं, खरकटं, नासकं, सडकं कसलंही अन्न असलं तरी थोडं वाढा मला महारणीला.. आम्हां गरिबांच्या पोटांत चार घांस घाला, नाही म्हणू नका. असे पाठमोरे होऊ नका!’’ आणि यावर ती जातिवंत मराठा स्त्री म्हणते, ‘‘अगं, चल चालती हो इथून! तुम्हा भिकारडय़ांसाठी आम्ही इथं काय अन्नछत्र घातलंय होय!’’ या पॉवरफूल नोटवर सुरू झालेलं नाटक तिसऱ्या अंकाच्या अखेरीस गावाने- म्हणजेच मराठा, ब्राह्मण आणि इतर सवर्ण यांनी गावातील समस्त महारांना आपलंसं केल्यानंतर जो कोरस कानावर पडतो तो- ‘‘ हे भारता करी ऐक्यता तुज, होय ती सुखदा आतां॥ ध्रु॥ मिळतां मधु सुमने सुमनाला। होई सुंदर नवमाला । सूत्रा धरुनी ईशपदाला। जाऊनि पावत मुक्तता ॥ १॥ मिळवुनिया दोरा दोरा। जरीपटका झाला सारा॥ ’’ असा आहे. या नाटकाबाबत खरं बोलायचं तर असं म्हणता येईल की, या नाटकात प्रचंड मोठय़ा, अविस्मरणीय ठराव्यात अशा घटना मुळातच नाहीत. ज्या आहेत त्यांचा एकूण आवाका नाटक पुढे नेण्यापुरताच आहे. खरं तर या घटना म्हणजे महार पक्ष आणि मराठा-ब्राह्मण पक्ष यांच्यातील वितंडेला अवकाश उपलब्ध करून देणाऱ्या नाटकीय युक्त्या वा ‘ड्रॅमटिक ट्रिगर’ आहेत. नाटकातल्या पात्रांचं विभाजन साहजिकच सवर्ण आणि महार अशा दोन वर्गात झालं आहे. महार ही माणसं आहेत हेच मानायला तयार नसलेली मुक्ता इथे आहे, काशी या महार मुलीशी विवाह करू पाहणारा आणि महारवाडय़ात येऊन महारवाडय़ाची साफसफाई करून त्यांना माणूस म्हणून वागवणारा अस्सल शहाण्णव कुळी मराठा श्रीपती आणि त्याचे कर्मठ आईबाप इथे आहेत. अष्टपुत्रे आणि आनंदी ही सुधारक म्हणवणारी प्रसिद्धीलोलुप जोडी इथे आहे आणि जातीव्यवस्थेने घालून दिलेल्या नियमांत आहे ते कफल्लक, निरर्थक, मूल्यहीन आयुष्य स्वीकारलेला महारांचा एक जथ्थाही इथे नाटक घडवतो आहे. मात्र इतकंच या नाटकात नाही. यात सवर्णवर्गाची दादागिरी झुगारणारे, त्यांना आव्हान देणारे, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्याची लालूच लाथाडणारे, अत्यंत स्वाभिमानी आणि स्वत्वाचा आग्रह धरणारे महार स्त्री-पुरुष इथे आहेत आणि तेच नाटकाचा कणा आहेत. मला नाटककाराच्या समाजवाचनाबद्दल, सामाजिक-राजकीय-धार्मिक घटितांचा अर्थ लावण्याच्या क्षमतेबद्दल, जाती-जातींतल्या उघड आणि छुप्या वर्चस्ववादी राजकारणातले बारीक तपशील माहिती असण्याबद्दल भयंकर आदर वाटतो. (जातिवंत बंडखोर आणि पत्रकार असेच असतात म्हणे!)  हा नाटककार एकाच वेळेला विविध विषयांना स्पर्श करून त्याच्या काळातला विश्वासार्ह आणि अस्सल राजकीय- सामाजिक नकाशा आणि त्याकडे पाहण्याचे असंख्य दृष्टिकोनही मर्यादित अवकाशात व्यक्त करत राहतो, हेच त्यांचं नाटकीय जाणतेपण आहे. नाटकातील विविध प्रसंगांच्या ओघात पात्रांच्या तोंडी असलेली काही विधानं आजही विवाद्य ठरतील आणि कदाचित नव्याने धुरळाही उडवू शकतील. १) ‘‘हिंदूु समाजच मुळी अतिरेकी आहे! सोवळ्याओवळय़ाचा अतिरेक, जातीचा अतिरेक, परंपरांचा अतिरेक!’’ २) ‘‘तुम्ही ब्राह्मण आता सगळे धंदे करू लागले आहात, पण त्या त्या धंद्यातल्या मूळच्या लोकांशी तुम्ही किती रोटीबेटी व्यवहार केले आहेत?’’ ३) ‘‘आम्ही अस्पृश्य मंडळी म्हारवाडय़ात म्हारकी करतो आणि समाजातले महापंडित साऱ्या समाजाचा महारवाडा बनवतात.’’ आणि हा मानला तर मास्टर स्ट्रोक- ‘‘अस्पृश्य मंडळीत तुम्ही महार लोक स्वत:चा मोठेपणा राखण्यासाठी भारी धडपडत असता! आमच्यात जसे ब्राह्मण तसे अस्पृश्यांत तुम्ही.. म्हणजे काशी, तुम्ही महार-ब्राह्मण आहात!!’’ नाटकातला मूळ प्रश्न अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचा आहे. त्या समस्येला नाटककाराने ठरलेल्या चौकटीत उत्तम न्याय दिलाय. मात्र त्यानिमित्ताने त्या काळाचा जो तुकडा नाटककाराने आपल्यासमोर ठेवला आहे तो ‘सोशल डॉक्युमेंट विथ मल्टिपल डिटेल्स’ म्हणून अत्यंत मोलाचा आहे यात कोणाचंही एकमतच होणार, हे नि:संशय! vijaytapas@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आभाळाचं पांघरूण घालणारा कवी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी