अलिबाग- अलिबाग शहरात दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. अपघातानंतर संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी शिघ्र कृती दलाला पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेलहून अलिबागला येणाऱ्या एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, त्याने बस स्थानकासमोर एका दुचाकी, तीन आसनी रिक्षा आणि समोरील एसटी बसला धडक दिली. या अपघातात १७ वर्षीय दुचाकीस्वाराचा दोन्ही बसच्या मध्ये चिरडून मृत्यू झाला. जयदीप शंकर बना असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. संतप्त जमावाने दोन्ही बसेसची दगडफेक करून तोडफोड केली. बस चालकाला आमच्या ताब्यात द्या म्हणून अशी मागणी करत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे अलिबाग शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

पोलीसांनी जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र सतप्त जमाव ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. अपघाताचे चित्रिकरण करण्याचा प्रय़त्न करणाऱ्यांनाही संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अलिबाग पोलीसांसह, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालयातील वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यानंतर शिघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकासही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्यासह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

ही परिस्थिती लक्षात घेऊन आंबेडकर चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक पोलीसांनी रोखून धरली होती. या परिसरातील दुकाने आणि हॉटेल्सही काही काळ बंद करण्यात आली आहे. अलिबाग आगारातून होणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 year old boy died st bus accident alibaug after the accident buses were vandalized by angry mobs ssb