सांगली : महापालिकेतील एनकॅपमध्ये निविदा मॅनेज प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी सहा अधिकार्यांसह १३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये निविदा कारकूनसह सहा अभियंत्यांना नोटीसा बजावल्या आहेत, तर सहा कर्मचार्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. सुमारे एक कोटी ३० लाखाची कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्याचा प्रयत्न यामुळे अधिकारी व कर्मचार्यांच्या अंगलट आला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील एनकॅप कामाचे तुकडे पाडून निविदा ठराविक ठेकेदारालाच मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले. खुल्या पध्दतीने निविदा मागणी केली असती स्पर्धात्मक दर मिळून महापालिकेचा आर्थिक फायदा होणार होता. मात्र, अंदाजपत्रकातील दरकरारानुसार ठेकेदाराला काम देण्याचा हा प्रयत्न होता.
आणखी वाचा-वैद्यकीय महाविद्यालयांच्या औषध खरेदीसाठी ६० कोटींची तरतूद वापर केवळ २५ कोटींचा!
याबाबत नागरी कृती समितीचे सतीश साखळकर यांनी तक्रार देताच आयुक्त सुनील पवार यांनी तातडीने सदोष निविदा प्रक्रिया रद्द करीत ही कामे महा ई टेंडर द्बारे प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला. दोन लिफाफा पध्दतीने ही कामे मॅनेज करण्याचा हा प्रयत्न उधळला गेला आहे.
या गैरप्रकाराची आयुक्तांनी गंभीर दखल घेत शहर अभियंता, नगर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पर्यावरण अभियंता, निविदा कारकून आदींसह सात अधिकार्यांना कारवाई का करू नये याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच या निविदा मॅनेज प्रक्रियेत सहभागी असलेल्या सहा कर्मचार्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.