प्रबोध देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील अकोला-अकोट दरम्यानच्या ४५ कि.मी.च्या मार्गामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे काही चिन्हे नाहीत. अगोदरच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गत अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्यातच आता गांधीग्राम येथील ब्रिटिशकालीन पूल खराब झाल्याने मार्ग बंद करण्यात आला. नवनिर्मित पूल पोच मार्गाअभावी निरुपयोगी ठरला. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाने दुप्पट अंतर पार करावे लागते. नव्या पुलावरून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रशासनाने ऐनवेळी भूसंपादनाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. वाहतुकीतील अडचण लक्षात घेता राजकीय नेत्यांनी धडपड करून बहुप्रतीक्षित अकोला-अकोट रेल्वेसेवा सुरू केली. ही रेल्वेसेवा रुळावर येण्याससुद्धा तब्बल पावणेसहा वर्षांचा कालावधी लागला आहे. अकोला-अकोट दरम्यानच्या अडथळय़ांच्या मार्गामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अकोला-अकोट मार्ग गेल्या काही वर्षांपासून कायम चर्चेत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र १६१ ए असलेल्या अकोला-अकोट मार्गाचे चौपदरीकरण गत पाच वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणा व राजकीय उदासीनतेमुळे एवढय़ा वर्षांत ४५ कि.मी.चे कामदेखील पूर्ण होऊ शकले नाही. अर्धवट रस्त्यावरूनच वाहनधारकांना धोकादायक वाहतूक करावी लागत होती. गांधीग्राम येथे पूर्णा नदीवर ९५ वर्षे जुना बिटिशकालीन पूल आहे. सिमेंट काँक्रीटचा देशातील हा पहिला पूल. पूर्णा नदीच्या पुराचे पाणी शेकडो वेळा पुलावरून गेले. पुलावरून नऊ दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रचंड वर्दळीची वाहतूक झाली. आयुष्यमान संपुष्टात आल्याने पूल कमकुवत झाला होता. तरीदेखील त्यावरून अत्यंत धोकादायक वाहतूक सुरूच होती. अखेर १८ ऑक्टोबरला पुलाला तडे जाऊन तो खाली झुकल्याने त्यावरील वाहतूक बंद झाली. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. अकोला-अकोट ४५ कि.मी.चे अंतर पर्यायी दर्यापूरमार्गे ८१ कि.मी.चे झाले आहे. वाहनधारकांना लांबून प्रवास करावा लागत असल्याने वेळेचा अपव्यय होत असून अतिरिक्त आर्थिक भरुदडदेखील बसत आहे.

अकोला-अकोटदरम्यान गोपालखेड येथे नवीन पुलाची निर्मिती २०१८ मध्ये करण्यात आली. यासाठी सुमारे १० कोटी ५६ हजारांचा खर्च झाला. प्रशासनाचे वेळकाढू धोरण व हलगर्जीपणामुळे चक्क पोच रस्त्याच तयार केला नाही. त्यामुळे चार वर्षांपासून हा पूल निरुपयोगी ठरत आहे. पुलाच्या निर्मितीनंतर कंत्राटदाराचा दोषदायित्वाचा कालावधी संपला तरी त्यावरून वाहतूक सुरू झाली नाही. आता गांधीग्रामचा पूल नादुरुस्त झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे.

अकोला-अकोट रस्ते मार्गाची अडचण निर्माण झाल्याने गेल्या दोन महिन्यांत रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ स्तरावर जोरदार हालचाली केल्या. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून अकोला-अकोटदरम्यान रेल्वेच्या दररोज तीन फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मीटरचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन होऊन रेल्वेसेवा सुरू होण्यास तब्बल पावणेसहा वर्षांचा कालावधी लागला. अकोला-खंडवा मीटरगेज मार्ग १ जानेवारी २०१७ ला बंद झाला. साडेतीन वर्षांत अकोला-अकोट दरम्यान रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करून २३ व २४ जुलै २०२२ ला नवनिर्मित मार्गावरून गाडीची गती चाचणी झाली. रेल्वेमार्ग सज्ज असताना करोनामुळे विलंब झाला. अनेकवेळा उद्घाटन लांबणीवर पडले. गांधीग्राम येथील पूल बंद पडल्यावर अखेर २३ नोव्हेंबरला अकोला-अकोट रेल्वेसेवेचा मुहूर्त निघाला. बहुप्रतीक्षित रेल्वेसेवा रुळावर आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पर्यायी मार्गाने वाहतुकीची कसरत

गोपालेखेड येथे पूल उभारला, मात्र त्याला पोचरस्त्याच नसल्याने वाहतूक करणार कशी? असा प्रश्न निर्माण झाला. आता पोचरस्त्यासाठी भूसंपादन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून रस्ता निर्मितीनंतर वाहतूक सुरू होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाहनधारकांना पर्यायी मार्गावरून वाहतुकीची कसरत करावी लागणार आहे.

चौपदरीकरणाचे काम अपूर्णच

अकोला-अकोट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुणे येथील एका कंत्राटदार कंपनीकडे होते. काम असमाधानकारक असल्याने २०२० मध्ये हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र, संथगतीने कामाची परंपरा कायम राखल्याने अद्यापही हे काम पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola akot dirangai railway national highway quadrupling work ysh