अमरावती : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासोबत सुरू असलेला वाद संपल्याचे जाहीर करतानाच सरकारसोबत सत्तेत राहण्याचा निर्णय मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केला. पहिली वेळ असल्याने माफ केले, पण यानंतर कुणीही आमच्या विरोधात चुकीचे बोलले, तर ‘प्रहार’चा वार दाखवू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून  राणा आणि कडू यांच्यात ‘खोक्यां’वरून वाद रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांनी मात्र आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून मंगळवारी निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते.

मंगळवारी दुपारी येथील नेहरू मैदानावर पार पडलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कडू म्हणाले, कोणीही यावे आणि काहीही म्हणावे, एवढे आम्ही सोपे नाही. पहिली वेळ असल्याने रवी राणांना माफ करतो, पण यानंतर कुणीही आमच्या विरुद्ध बोलेल, तर त्यांना ‘प्रहार’चा वार दाखवू. आम्ही गांधीजींना मानतो, मात्र भगतसिंह डोक्यात आहे. राणांनी दिलगिरी व्यक्त केली, त्याचा आनंद आहे. अन्यथा आम्हाला उगाच अधिक हातपाय हालावावे लागले असते. पण राणांनी मोठेपणा घेत चूक लक्षात आली आणि माफी मागितली, त्याबद्दल पुन्हा आभार मानतो. आपण दोन पावले मागे घेतले, आम्ही चार पावले माघे घेऊ. विनाकारण आम्हाला ऊर्जा संपवायची नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

आमच्या नादी लागाल तर तोंड रंगवू, सत्ता गेली चुलीत, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. चार वेळा मी आमदार म्हणून निवडून आलो. आज शेतकऱ्यांच्या, अपंगांच्या प्रश्नांवर कोणताही राजकीय पक्ष भूमिका घेताना दिसत नाही. निवडणुकीच्या वेळी जाती-धर्माचे विषय बाहेर काढले जातात.  करोना संपला आणि भोंग्यांचा विषय समोर आला. जोवर आपण सर्व मूळ मुद्यांवर एकत्र येणार नाही, तोपर्यंत ही व्यवस्था ठीक होणार नाही. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या भाषणात प्रहार पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 

‘आम्ही म्हणू तसे सरकारने वागले पाहिजे’

प्रहार जनशक्ती पक्ष पुढील काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचेल. आज  प्रहारचे दोन आमदार आहेत, पण येत्या काळात १० जण असतील, आम्ही जसे म्हणू तसे सरकार वागले पाहिजे, अशा पद्धतीने पक्षाची शक्ती उभी करू, असा निर्धारही कडू यांनी व्यक्त केला.

पाच मागण्यांसाठी सरकारला वर्षभराची मुदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेमार्फत करावी, प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटावे, शेतकरी-शेतमजूर तसेच असंघटित कामगारांना न्याय मिळावा, या मागण्या आम्ही सरकारपुढे मांडणार असून या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी एक वर्षांची मुदत देणार आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले.