अहिल्यानगरः प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २००४-५ मधील तसेच २००७ या कालावधीतील संचालक मंडळाविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरू विखे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन झोनल मॅनेजर व युनियन बँकेचे तत्कालीन झोनल मॅनेजर यांचाही समावेश आहे.
बाळासाहेब केरू विखे यांनी फिर्यादीत नमूद केले की, डॉ. विखे कारखान्याने बनावट कागदपत्रे करून, बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार करून बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून अनुक्रमे ३ कोटी ११ लाख ६० हजार ९८६ रु. व ५ कोटी ७४ लाख ४२ हजार २२० असे एकूण ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपये शेतकरी सभासदांच्या नावे मंजूर केले. प्रत्यक्षात ही रक्कम सभासदांना प्रदान करण्यात आली नाही. रकमेची अफरातफर करून शासनाची फसवणूक केली व कर्जमाफी योजनेस पात्र नसतानाही कर्जमाफी प्राप्त करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला.
यासंदर्भात पाठपुरावा करणारे प्रवरा शेतकरी मंडळाचे बाळासाहेब केरू विखे व अरुण कडू यांनी सांगितले की, सुरुवातीला या संदर्भात लोणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु, त्यांनी तक्रार दाखल न करून घेतल्याने राहाता येथील प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाविरुद्ध विखे कारखान्याच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. उच्च न्यायालयाने राहता न्यायालयाचा आदेश अमान्य केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१५, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४७१, ३४ व १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्र्यांच्या नावाचा समावेशन्यायालयाच्या आदेशानुसार विखे कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाचा समावेश आहे. – वैभव कलुबर्मे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीरामपूर
पोलीस अधिकाऱ्यांची टाळाटाळ
या गुन्ह्याचा तपास लोणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे आहे. त्यांनी या संदर्भात सांगितले, की सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध आर्थिक अनियमितता व इतर कलमान्वये सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव आहे का? याबाबत विचारले असता वाघ यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे टाळत सर्व संचालकांवर गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री विखे यांच्याकडून प्रतिक्रिया नाही
या संदर्भात कारखान्याचे सर्वेसर्वा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही उपलब्ध झाले नाहीत.