सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते या दोन्ही तुल्यबळ तरुण आमदारांची थेट लढत होत असताना त्यात वचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड हे उतरले आहेत. त्यामुळे होणाऱ्या लढतीमध्ये बसणारा मत विभाजनाचा संभाव्य फटका टाळण्याचे आव्हान काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.

राहुल काशीनाथ गायकवाड (वय ४४) हे अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावचे राहणारे असून त्यांचे वाणिज्य पदवीसह परकीय व्यापार विषयाचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांचे वडील काशीनाथ गायकवाड हे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आहेत. त्यांची उमेदवारी स्थानिक राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीशी मैत्रीच्या अनुषंगाने झालेल्या वाटाघाटी फिस्कटल्याच्या पार्श्वभूमीवर सात जागांवर काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केले होते. यात सोलापूरच्या जागेबाबत त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अखेर राहुल गायकवाड यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने आणली आहे. त्यामुळे सोलापूरची लढत अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा – “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना प्रकाश आंबेडकर यांच्या (एक लाख ७० हजार मते) उमेदवारीमुळे मतविभाजनाचा मोठा फटका बसून दीड लाख मतांच्या फरकाने विजयापासून ‘वंचित’ राहावे लागले होते.