लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरपूर : भाविकांसाठी आनंदाची वार्ता. आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेच्या वेळेस विठुरायाचे मुख दर्शन घेता येणार आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकरी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सुलभ व जलद व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

आषाढी वारी कालावधीत भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबातचा आढावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. येथील भक्त निवास येथे झालेल्या बैठकीस खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-वरुणराजाच्या साक्षीने पुरंदवडे येथे माउलींचे, तर अकलूज येथे तुकोबारायाचे रिंगण संपन्न

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत मुखदर्शन घेणारा भाविक वारकरी मुख दर्शन रांगेत खोळंबून राहतो. महापुजा कालावधीत मुखदर्शन सुरू राहिल्यास वारकरी भाविकांना त्याचा लाभ होईल. मुखदर्शन सुरू ठेवण्याबाबत आवश्यक उपाय योजना मंदिर समितीने करावी. तसेच मंदिर समितीने व्हीव्हीआयपी यांना बसण्याचे ठिकाण, मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार याबाबत आवश्यक ते नियोजन करावे. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर व्हीआयपी दर्शन होणार नाही. मात्र पारंपारिक दिंड्यांचे प्रथा परंपरेप्रमाणे दर्शन सुरू राहील याची दक्षता मंदिर समितीने घेवून आवश्यकती कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या .

चंद्रभागा वाळवंट व आवश्यक ठिकाणी चेंजिंग रूम तयार कराव्यात. वारीत उभारण्यात आलेल्या शौचालयांमध्ये नियमित व पुरेसा पाणी साठा उपलब्ध करून द्यावा. तसेच भाविकांच्या सुविधेसाठी असणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर तसेच पारंपारिक जागा येणाऱ्या भाविकांना अधिकची जागा उपलब्ध व्हावी यासाठी पंढरपूर शहरालगत असणाऱ्या खाजगी जागा भाडे तत्त्वावर घेण्याबाबत प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरु करावी असेही पालकमंत्री विखे -पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continue mukhdarshan during the official mahapuja of ashadhi ekadashi guardian minister vikhe patil instructs temple administration mrj