Dengue in Raigad district – रायगड जिल्ह्यात मलेरीयाचे प्रमाण घटले असले तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत डेग्यूचे ४४६ रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील ११२ रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात गेल्या २१ दिवसांतील आहेत. पूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादीत असलेला डेंग्यू आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फैलावला असल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात ४ हजार ४६४ जणांची डेग्यूसाठी तपासणी करण्यात आली. यात ४४६ जणांना डेग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील १८२ तर रायगड ग्रामीणमधील २६४ रुग्णांचा समावेश आहे. यावरून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेग्यूचा प्रादुर्भाव सरू झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी डेंग्यूचे बहुतांश रुग्ण हे पनवेल महानगर क्षेत्रात आढळून येत असत. मात्र गेल्या वर्षभरात रायगडच्या ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रातील इंधनाच्या किमती बदलल्या, मुंबई-पुण्यात पेट्रोलचा भाव काय? 

ऑगस्ट महिन्यात गेल्या २१ दिवसांत ११२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ६६ तर रायगड ग्रामीणमधील ४६ रुग्णांचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोप्रोली, खोपटे, अलिबाग तालुक्यातील वाघ्रण, कावाडे, सारळ तर पेण तालुक्यातील जिते गावात डेंग्यूचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे मच्छरांची उत्पत्ती टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र यासाठी दरवर्षी जून महिन्यात केली जाणारा फवारणी यंदा करण्यात आलेली नसल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा – Badlapur Sexual Assault : “जबरदस्तीने स्त्रीचे कपडे काढले जातात, पण…”; बदलापूरमधल्या घटनेवर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

डेंग्यूचा धोका

डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे या आजाराला गांभीर्याने घेण गरजेच असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue has intensified in raigad district dengue infection increased in panvel uran pen alibaug ssb