तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता रविवारी रात्री सोलापूर येथील मानाच्या काठ्याच्या छबिन्याने होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी दिवसभरात आई राजा उदो-उदोचा जयघोष करीत सोलापूरसह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांनी तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. रविवारी पहाटे भाविकांची संख्या पाच ते सहा लाखाच्या घरात जाण्याचा अंदाज मंदिर प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीमोल्लंघनानंतर देवीची मंचकी निद्रा सुरू झाली. यंदा कोजागरी आणि मंदिर पौर्णिमा अशा दोन पौर्णिमा आहेत. शनिवारी चंद्रग्रहण असल्यामुळे गर्दीवर देखील परिणाम झाला होता. रात्री ११ वाजता प्रक्षाळ पुजेनंतर ११.३० ते १२ वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर तुळजाभवानी मंदिराचा कडी दरवाजा उघडण्यात आला आणि चरणतीर्थ अभिषेक करण्यात आला. विधीवत धार्मिक कार्यक्रमानंतर रात्री १२.३० वाजता तुळजाभवानी देवीची मंचकावरून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

आणखी वाचा-धाराशिव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न मिटला

सोलापूरच्या मानाच्या काठ्या रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत तुळजाभवानीच्या नगरीत दाखल होणार आहेत. वाद्यांच्या गजरात या काठ्यांचे तुळजापूर शहरात मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले जाते. सायंकाळी ७ वाजता तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा संपल्यानंतर सोलापूरच्या काठ्यांसह रात्री ११ वाजता छबिना मिरवणूक पार पडणार आहे. त्यानंतर तुळजाभवानी देवीचे महंत जोगवा मागतील आणि कोजागरी पौर्णिमेच्या या उत्सवाने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees in tuljapur on the occasion of kojagari purnima mrj