धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना जाब विचारीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकरा मराठा आंदोलकांवर येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी शहरातील पुष्पक पार्क हॉटेल येथे राज ठाकरे व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर ठाकरेंनी आंदोलकांशी संवादही साधला होता. आंदोलन संपल्यानंतर आता अकरा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर येथील दौरा संपवून राज ठाकरे सोमवारी धाराशिव शहरात दाखल झाले. सोलापूर येथे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिव येथील मराठा समाजातील तरुणांनी राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरेंना जाब विचारण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक हॉटेलवर गोळा झाले. जोरदार घोषणाबाजी करीत गोळा झालेल्या आंदोलकांना राज ठाकरेंनी सुरुवातीला भेट नाकारली. मात्र संतप्त आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी आंदोलकांसोबत संवादही साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि जाब विचारण्यासाठी गोळा झालेले आंदोलक यांच्यात संवाद घडवून आणला आणि वाढलेला तणाव निवळला.

हेही वाचा – अलिबाग विरार मार्गिकेतही विरोधाचा खोडा, दोन वर्षांत रायगडात २० टक्केही भूसंपादन पूर्ण नाही

हेही वाचा – रत्नागिरीत हिट अँड रन; व्हॅगनार गाडीने दोन गाड्यांना ठोकले

दुसर्‍या दिवशी पोलीस संरक्षणात राज ठाकरे यांचे निर्धारित कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यातील मनसे पदाधिकार्‍यांची बैठक आणि पक्षाच्या विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर मंगळवारी राज ठाकरे धाराशिवहून लातूरकडे रवाना झाले. त्यानंतर आनंदनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हनुमंत जालिंदर म्हेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धैर्यशील सस्ते (रा. येडशी), निखिल जगताप (रा. धाराशिव), निलेश साळुंके, बलराज रणदिवे, अभिजीत सूर्यवंशी, हनुमंत यादव, बापू देशमुख, सौरभ गायकवाड (रा. धाराशिव), अक्षय नाईकवाडी (रा. कौडगाव), अमित जाधव (रा. नारी, ता. बार्शी), तेजस बोबडे (रा. तुळजापूर) या अकरा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असल्याची फिर्याद म्हेत्रे यांनी दिली आहे. त्यानुसार वरील अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv case has been filed against the maratha protesters who demanded a response from raj thackeray ssb