राजकीय अनास्थेमुळे दोडामार्ग तालुका न्यायालय इमारत पूर्ण होऊनही न्यायालयीन कामकाज होण्याचे रखडले आहे. सुमारे ५०० केसेसच्या बंधनामुळे न्यायालय सुरू होत नसल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी तालुक्याचे विभाजन करून दोडामार्ग तालुका निर्माण झाला, पण आजही न्यायालयाच्या प्रतीक्षेत दोडामार्ग तालुका आहे. न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण झाली, पण सावंतवाडीत कार्यरत असणारे न्यायालय दोडामार्गमध्ये स्वतंत्रपणे सुरू होण्यास अडथळे निर्माण झाल्याने न्यायालयाच्या प्रतीक्षेत दोडामार्ग तालुक्यातील लोक आहेत.
दोडामार्ग तालुका आणि दुर्गम, डोंगरखोऱ्यांचा आहे. त्याशिवाय या तालुक्याची लोकसंख्या पाहता केसेसचे बंधन ठेवणे चुकीचे मानले जाते. दोडामार्ग तालुक्यातील किमान ५०० केसेस सध्या न्यायालयात दाखल असतील तरच न्यायालय स्वतंत्रपणे कारभार सुरू होऊ शकतो, असे सांगण्यात येते.
दोडामार्ग तालुक्याच्या मध्यंतरी ५०० केसेस होत्या, पण लोकन्यायालय, महाअदालत, महात्मा गांधी तंटामुक्ती अशा अभियनातून न्यायालयीन कामकाज कमी होत गेले असल्याने दोडामार्ग तालुक्याच्या केसेस कमी प्रमाणात पेंडिंग आहेत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात स्वतंत्र न्यायालय सुरू होण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात येते.
राजकीय अनास्थेमुळे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्यास अडचणी येत आहेत, असे बोलले जाते.
दोडामार्ग पोलीस कोठडीत त्रुटी
दोडामार्ग पोलीस ठाण्याची नव्याने बांधण्यात आलेली पोलीस कोठडी ऐषारामाची असल्याचे उघड झाले आहे. या श्रीमंती थाटातील पोलीस कोठडीचा सध्या वापर केला जात नाही. संशयित आरोपींना सध्या सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले जात आहे.
दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत फॅन लावण्यात आला आहे. शिवाय खिडक्यांची तावदाने काचेची आहेत. त्यामुळे एखादा संशयित आरोपी गळफास लावू शकतो किंवा पोलीस कोठडीतून पळण्याची भीती पोलिसांना वाटते म्हणूनच पोलीस आरोपींना सावंतवाडीत ठेवत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficulty arises to start independent court in dodamarg